डॉक्टर देवासारखा दुर्मिळ

भारतात दर १७०० लोकांमागे एक डॉक्टर आहे. एक हजार लोकांमागे एक डॉक्टर हे जगातले आदर्श प्रमाण मानले जाते. भारताला ते २०३१ साली साध्य करायचे असेल तर देशाला येत्या पाच वर्षात २०० वैद्यकीय महाविद्यालये काढावी लागतील. तशी ती न काढल्याने आता सहा लाख डॉक्टरांची टंचाई जाणवत आहे. अमेरिकेत दर ३९० लोकांमागे एक डॉक्टर असतो. भारतात तर एवढे डॉक्टर असणे हे स्वप्नच वाटते. आपल्या देशात सहा लाख डॉक्टरांची गरज आहे असे आपण लोकसंख्येवरून आणि वैद्यकीय महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांच्या संख्येवरून म्हणतो. म्हणजे या महाविद्यालयातून बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी डॉक्टरी व्यवसाय करतोच असे आपण मानलेले असते. पण या बाबतची एक आकडेवारी असे सांगते की, आपण देशात जेवढे डॉक्टर्स आहेत असे मानतो तेवढे व्यवसाय करीत नाहीत. त्यातले दोन लाख डॉक्टर हा व्यवसाय करीत नाहीत. म्हणजे आज आपल्या देशात लोकसंख्येमागचे डॉक्टरांचे आदर्श प्रमाण गाठण्यासाठी सहा नव्हे तर आठ लाख डॉक्टरांची गरज आहे. त्यासाठी २०० नाही तर किमान ३०० महाविद्यालये काढली पाहिजेत. ते शक्य नाही म्हणून त्याला एक पर्याय शोधण्यात आला आहे.

सरकारने कमी मुदतीचा एक वैद्यकीय अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा अभ्यासक्रम बारावी नंतर तीन वर्षात पुरा करता येईल आणि तो पूर्ण करणार्‍या विद्यार्थ्याला बीएससी (कम्युनिटी मेडिसीन) अशी पदवी मिळेल. म्हणजे हा वैद्यकीय अभ्यासक्रमच असेल परंतु तो आत्ताच्या एमबीबीएस सारखा नसेल. एमबीबीएसचा अभ्यासक्रम ङ्गार खर्चिक आहे. बारावी नंतर जवळपास सहा वर्षांनी तो पूर्ण होतो. मात्र हा नवा अभ्यासक्रम तीन वर्षात पूर्ण होईल. ही पदवी घेणार्‍याला एमबीबीएसच्या विद्यार्थ्याएवढे वैद्यकीय ज्ञान नसेल मात्र ग्रामीण भागात छोट्या मोठ्या आजारांवर उपचार करण्याइतपत ज्ञान त्याला मिळालेले असेल. सध्या आपल्या देशामध्ये ग्रामीण भागात डॉक्टर कमी आहेत. देशाची सत्तर टक्के लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. परंतु देशात तयार होणार्‍या डॉक्टरांपैकी तीस टक्केच डॉक्टर ग्रामीण भागात जातात आणि शहरी भागात राहणार्‍या तीस टक्के लोकांसाठी सत्तर टक्के डॉक्टर उपलब्ध असतात. या सत्तर टक्के डॉक्टरांपैकी सगळ्यांचाच व्यवसाय उत्तम चालतो असे नाही. मात्र शहरात तो कितीही कमी चालला तरी हे डॉक्टर ग्रामीण भागात जात नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातल्या माणसांची मोठी कुचंबणा होते.
चांगला डॉक्टर हवा असेल तर शहरात जावे लागते.

शहरातल्या लोकांपेक्षा खेड्यातल्या लोकांचा आजार जास्त महाग असतो. कारण त्यांना वैद्यकीय उपचारांसाठी गाव सोडून यावे लागते. रोजगार बुडतो, शहरामध्ये राहायची व्यवस्था करावी लागते, एकंदरीत डॉक्टरांची ङ्गी देणे लागतेच पण हे वरकड खर्चसुध्दा मर्यादपेक्षा जास्त होतात. चीनमध्येही अशीच परिस्थिती होती. परंतु तिच्यावर तिथल्या लोकांनी मात केली आणि दोन वर्षाचा वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या बेअरङ्गूट डॉक्टरांना ग्रामीण भागात पाठविले. अशा डॉक्टरांना मराठीत अनवाणी डॉक्टर म्हणतात. खरे म्हणजे भारताच्या ग्रामीण भागामध्ये जिथे डॉक्टर पोहोचत नाही तिथे कंपौंडर मंडळीच डॉक्टरांचे काम करताना दिसतात. त्यांना कसलेच शिक्षण नसते पण केवळ निरीक्षणातून, डॉक्टरसोबत काम करताना ऐकून कळलेल्या माहितीवरून हे लोक जमेल तसे औषधोपचार करतात. त्यातून सगळ्याच रुग्णांना ङ्गायदा होतो असे नाही. अशा डॉक्टरांना मराठवाड्यात निमहकीम म्हणण्याची प्रथा आहे. म्हणजे अर्धवट डॉक्टर. अर्धवट डॉक्टर ही संज्ञा नकारात्मक असली तरी ती गरजेतून निर्माण झालेली आहे. त्यामुळे तिच्याकडे उपेक्षेने पाहता येत नाही. असे हे निमहकीम लोकांच्या उपयोगी पडतात. अर्थात भारतामध्ये डॉक्टरकीचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केलेले काही डॉक्टर्स आहेत. अशा डॉक्टरांवर आता बंदी आलेली आहे. पण तरीही चोरीछुपे त्यांचा व्यवसाय सुरूच असतो.

चांगला डॉक्टर उपलब्ध असला तर लोकांना अशा अर्धवट किंवा भोंदू डॉक्टरांचे उपचार घेण्याची काही हौस नसते. त्यांची गरज असते म्हणून ते अशा डॉक्टरकडे वळतात. त्यांना आधुनिक वैद्यकाची जुजबी का होईना पण माहिती असते. काही ठिकाणी आयुर्वेदाचे परंपरेने चालत आलेले ज्ञान असणारे काही लोक असतात. त्यांना चूर्णे आणि काही काढे तरी माहीत असतात. मात्र काही भागात मांत्रिक आणि वैदू यांचे काम चालते आणि ते वरच्या कोणत्याही डॉक्टरांपेक्षा धोकादायक असते. अशा सगळ्या अडचणीतून ग्रामीण भागातल्या लोकांना बर्‍यापैकी वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी काहीतरी करण्याची गरज होतीच. त्या गरजेतून हा बीएससी (कम्युनिटी मेडिसीन)चा अभ्यासक्रम पुढे आला आहे. याशिवाय सरकारने आणखी एका अभ्यासक्रमाची योजना आखलेली आहे. तिच्यामध्ये परिचारक किंवा परिचारिकांना त्यांच्या अभ्यासक्रमापेक्षा थोडे जास्त ज्ञान देऊन डॉक्टरी प्रॅक्टीस करण्याची परवानगी दिली जाणार आहे. बीएससीच्या पदवी प्रमाणेच हेही डॉक्टर्स लोकांच्या उपयोगाला पडणारे ठरणार आहेत. कारण परिचारक आणि परिचारिकांना काही ना काही वैद्यकीय ज्ञान असतेच. ज्या भागामध्ये डॉक्टरांचे दर्शन होणेसुध्दा मुश्किल आहे अशा भागात हे बीएससी आणि परिचारिका कम डॉक्टर उपयुक्त ठरतील अशी अपेक्षा आहे.

Leave a Comment