घामातही असतात ऍन्टीबायोटिक्स

आपल्या घामामध्ये डर्मिसिडीन नावाचे प्रतिजैविक म्हणजे ऍन्टीबायोटिक असते आणि ते क्षयरोगावर गुणकारी असते. त्याचबरोबर शरीरावर काही रोगजंतू बसून काही विकार जडतात. त्या रोगजंतूंनासुध्दा डर्मिसिडीन नष्ट करते. असे ब्रिटनमध्ये करण्यात आलेल्या एका संशोधनात आढळून आलेले आहे. ब्रिटनमधील एडीनबर्ग विद्यापीठामध्ये चार संशोधकांनी घामामध्ये आढळणार्‍या या गुणकारी ऍन्टीबायोटिकचे अधिक विश्‍लेषण केले असून त्याची आण्विक रचना जाणून घेतली आहे. नॅशनल ऍकॅडमी ऑङ्ग सायन्सेसच्या मुखपत्रामध्ये या संशोधनाचे तपशील प्रसिध्द झाले आहेत.

या शास्त्रज्ञांनी असे म्हटले आहे की जगामध्ये सुमारे १७०० नैसर्गिक प्रतिजैविके अस्तित्वात आहेत परंतु त्यांच्या गुणधर्माचे तपशीलवार विश्‍लेषण अजून झालेले नाही. ही प्रतिजैविके कशी काम करतात. याचा सुगावा लागलेला नसल्यामुळे त्यांचा आपल्या जीवनामध्ये कसा उपयोग होऊ शकेल हे अद्याप तरी अज्ञात राहिले आहे मात्र या शास्त्रज्ञांना आपल्या घामातल्या या प्रतिजैविकाच्या कार्यकलापाचा अंदाज आला असून ते टीबीवर म्हणजे क्षयरोगावर उपयुक्त ठरू शकेल असा विश्‍वास वाटायला लागला आहेे.

या संस्थेतील संशोधक वुल्रिच झकारिया यांनी म्हटले आहे की आपल्याला होणार्‍या अनेक आजारांवर उपयुक्त ठरू शकतील अशी प्रतिजैविके आपण बाजारातून विकत आणतो परंतु प्रत्यक्षात त्याची गरज नाही. आपल्या शरीरातल्या घामासारख्या काही स्रावातून निसर्गतःच अशी काही प्रतिजैविके पाझरत असतात की ती काही व्हायरस, बुरशी किंवा रोगजंतू यांचा बंदोबस्त करत असतात. हे सत्य एकदा कळल्यानंतर त्यांनी डर्मिसिडीनचा अधिक पाठपुरावा केला आणि ते कसे काम करते याचा छडा लावला.

आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे क्षयरोगावर जी प्रचलित औषधे आहेत त्या औषधांपेक्षा डर्मिसिडीन अधिक प्रभावीपणे काम करते असे त्यांना आढळले. आपल्या घामामधून पाझरणारी इतरही काही द्रव्ये उपयुक्त ठरू शकतात. असेही त्यांचे म्हणणे आहे. आपल्याला एखादी जखम होते तेव्हा ती दुरूस्त व्हावी किंवा त्यावर खपली बसावी म्हणून आपण मलम लावतो आणि त्यामुळे जखम बरी होते परंतु काही वेळा अशा जखमा आपोआपच बर्‍या होतात कारण घामामध्ये असणार्‍या प्रतिजैविकांचा तो परिणाम असतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment