वेस्ट इंडिजवर भारताचासहा गडी राखून विजय

कोची- विजयी कामगिरीत सातत्य राखताना पहिल्या वनडेत गुरुवारी वेस्ट इंडिजवर सहा विकेटनी मात केली. तसेच तीन लढतींच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. पाहुण्यांचे 212 धावांचे आव्हान यजमानांनी 14.2 षटके राखून पार केले. सलामीवीर रोहित शर्मा (81 चेंडूंत 72 धावा) आणि वनडाउन’ विराट कोहलीने (84 चेंडूंत 86 धावा) बहारदार फलंदाजी करत भारताला आरामात जिंकून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. शिखर धवन (5) लवकर परतला तरी रोहित आणि विराटने दुस-या विकेटसाठी 133 धावांची भागीदारी रचताना यजमानांचे फलंदाजीतील वर्चस्व कायम ठेवले. रोहितने 20वे अर्धशतक ठोकताना आठ चौकार आणि एक षटकार लगावला. विराटच्या 27व्या अर्धशतकात नऊ चौकार आणि दोन षटकारांचा समावेश आहे.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय पाहुण्यांसाठी फलदायी ठरला नाही. डावखुरा रवींद्र जडेजा आणि सुरेश रैनाच्या (प्रत्येकी तीन विकेट) प्रभावी फिरकीसमोर वेस्ट इंडिजचा डाव 48.5 षटकांत 211 धावांत संपला. डॅरेन ब्राव्हो (77 चेंडूंत 59 धावा) आणि सलामीवीर जॉन्सन चार्ल्सच्या (34 चेंडूंत 42 धावा) दमदार फलंदाजीमुळे त्यांना दोनशेची मजल मारता आली.

पाहुण्यांची भिस्त सलामीवीर ख्रिस गेलवर होती. मात्र त्याला खातेही खोलता आले नाही. दुस-याच चेंडूवर चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात भुवनेश्वर कुमारने त्याला धावचीत केले. ही आत्मघाती धाव घेताना गुडघ्यावर पडल्याने गेलला स्ट्रेचरवरून पॅव्हेलियनमध्ये न्यावे लागले. सलामीवीर चार्ल्सने मार्लन सॅम्युअल्ससह दुस-या विकेटसाठी 65 धावांची झटपट भागीदारी केल्याने गेलच्या धक्क्यातून सावरण्यात वेस्ट इंडिजला यश आले.

भराभर धावा जमवणारा चार्ल्स महागात पडणार असे वाटल्याने कर्णधार ढोणीने रवींद्र जडेजाला गोलंदाजीला आणले. जडेजाने पहिल्याच षटकातील चौथ्या चेंडूवर डाव्या बाजूला चार्ल्सचा अप्रतिम झेल टिपत भारताला महत्त्वपूर्ण विकेट मिळवून दिली. चार्ल्सच्या 42 धावांच्या झटपट खेळीत सात चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. चार्ल्सनंतर सॅम्युअल्स (24) परतला. मात्र ही स्थिरावलेली जोडी बाद झाली तरी डॅरेन ब्राव्होने लेंडल सिमॉन्ससह चौथ्या विकेटसाठी 65 धावांची भागीदारी करताना वेस्ट इंडिजचे शतक फलकावर लावले. सिमॉन्सला (29) पायचीत करत रैनाने ही जोडी फोडली. ब्राव्होने एक बाजू लावून धरताना 59 चेंडूंत चार चौकार आणि दोन षटकारांसह 13 वे अर्धशतक ठोकले तरी यजमानांच्या अचूक फिरकी मा-यासमोर शेवटच्या सात विकेट केवळ 69 धावांत पडल्याने पाहुण्यांना आपल्या वाट्याची सर्व षटकेही खेळून काढता आली नाहीत. रैना आणि जडेजाने प्रत्येकी तीन तसेच अश्विनने दोन विकेट घेतल्या.

Leave a Comment