नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनकडून आनंदचा पराभव

चेन्नई- जगज्जेतेपदाच्या लढतीत नवव्या डावात गुरुवारी जगज्जेता विश्वनाथन आनंदला आव्हानवीर आणि नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनकडून 28 चालींमध्ये पराभव स्वीकारावा लागला. या विजयासह कार्लसनने आनंदविरुद्धची आघाडी तीन गुणांनी वाढवताना जेतेपदाच्या दिशेने कूच केली. पहिलेवहिले जगज्जेतेपद पटकवण्यासाठी त्याला उर्वरित तीन डावांत केवळ अर्धा गुण पुरेसा आहे. त्यातच दहाव्या डावात कार्लसन काळी मोहरी घेऊन खेळणार असल्याने शुक्रवारीच त्याला जगज्जेतेपदावर शिक्कामोर्तब करण्याची शक्यता आहे.

नवव्या फेरीनंतरही विजय मिळवता न आल्याने नियोजित 12व्या डावापूर्वीच निकाल अपेक्षित आहे. जगज्जेतेपद राखण्याच्या रेस’मध्ये राहायचे असेल तर आनंदला उर्वरित तीनही डाव जिंकण्याचे खडतर आव्हान आहे. या स्थितीत एक पराभव किंवा बरोबरी स्वीकारणेही त्याला परवडणारे नाही. सहावा डाव गमावताना आनंदने मोक्याच्या क्षणी जी चूक केली होती तोच प्रकार त्याने नवव्या डावात केला. 27व्या चालीत आनंदने राजाच्या शेजारी असलेला हत्ती दोन पावले पुढे नेला. मात्र त्याच वेळी कार्लसनने त्याचे आनंदच्या घरात आलेले प्यादे (पॉन) शेवटच्या घरात नेत त्याचा वजिर केला.

ते पाहून दडपणात आलेला आनंदने उंटाला राजाच्या शेजारी मागे आणण्याची चाल खेळण्याऐवजी घोड्याला मागे आणण्याची (एनएफ1) चुकीची चाल खेळली. तेथेच त्याचा पराभव झाला. या डावात विजय नोंदवणे आनंदसाठी आक्रमक असल्याने सुरुवातीपासून तो आक्रमक खेळला. कार्लसनने निम्झो इंडियन डिफेन्स पद्धत वापरली. 22व्या चालीपर्यंत आनंदला संधी असल्याचे चित्र दिसत होते. मात्र 22वी चाल खेळायला कार्लसनने जवळपास 20 मिनिटे घेतली. मात्र त्यावेळी त्याने निर्णायक ठरलेले प्यादे (पॉन) आनंदच्या घराच्यादिशेने सरकवत दमदार चाल खेळली होती. पाठोपाठ आनंदनेही 23वी चाल खेळायला जवळपास 35 मिनिटे घेतली. मात्र कार्लसनची व्यूहरचना त्याला कळली नाही. वजिराला योग्यत-हेने खेळण्यातही आनंद पूर्णपणे अपयशी ठरला.

Leave a Comment