सचिन तेंडुलकरच्या ‘डी.लिट’ चा प्रस्ताव कुलगुरूकडे

मुंबई: मास्टर ब्लास्टार सचिन तेंडुलकरला देशातील सर्वोच्च पुरस्कार मिळालेल्या, पुणे विद्यापीठाने ‘डी.लिट’ ही पदवी द्यावी, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून जोर धरत आहे. त्यातच आता पुणे विद्यापीठाच्या सिनेट सदस्यांनी त्याबाबतचा प्रस्ताव कुलगुरू वासुदेव गाडे यांच्याकडे पाठवला आहे. त्यामुळे आता लवकरच सचिनला ‘डी.लिट’ ही पदवी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मास्टर ब्लास्टार सचिन तेंडूलकरने सलग २४ वर्ष क्रिकेट क्षेत्राला अतुलनीय योगदान दिले आहे. त्याचा सन्मान म्हणून त्याला डी. लिट पदवी द्यावी, अशा मागणीचे पत्र डॉ. गजानन एकबोटे, दादाभाऊ शिनलकर, संतोष ढोरे, शशीकांत तिकोटे, डॉ. प्रवीण चौधरी आणि डॉ. संजय खरात यांनी या सिनेट सदस्यांनी विद्यापीठाला पाठवले आहे. हा प्रस्ताीव कुलगुरू गाडे यांना प्राप्त झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

क्रिकेटमधील तेंडुलकरची अतुलनीय कामगिरी सर्वज्ञात आहे. जगभरात सचिनने देशाचे नाव उंचावले आहे. सचिनची कामगिरी युवा पीढीसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरेल. त्याला भारतरत्ननेही सन्मानत केले आहे. सचिनच्या कार्याचा गौरव पुणे विद्यापीठानेही, मानद डॉक्टरेट अर्थात डी. लिट. पदवी देऊन करावा, असे ढोरे यांनी म्हटले आहे. दरम्यान, सिनेट सदस्यांच्या प्रस्तावावर विद्यापीठ नियमांनुसार विचार केला जाईल, असे कुलगुरू गाडे यांनी सांगितले आहे.