निरोगीपणाची सप्तपदी

अमेरिकन हार्ट असोसिएशन या संघटनेने आपल्या देशातल्या लोकांसाठी चांगले आयुष्य जगण्याकरिता म्हणून महत्त्वाच्या सात गोष्टी सांगितल्या आहेत. सात गोष्टी म्हटल्यापेक्षा आपण त्याला निरोगी पणासाठी पाळावयाची सात पथ्ये म्हणू शकतो. ही सात पथ्ये पाळल्यास माणूस छान आयुष्य जगू शकतो, औषधापासून दूर राहू शकतो हे तर कोणीही सांगू शकेल. भारतातील आयुर्वेदानेसुध्दा अशीच काही पथ्ये सांगितली आणि ती पाळल्यास माणूस निरामय जीवन जगू शकतो असे वर्षानुवर्षे आढळलेले आहे. परंतु अमेरिकेतल्या कर्करोगाच्या क्षेत्रात काम करणार्‍या काही संघटनांनी या सात पथ्यांवर अधिक संशोधन केले. ही पथ्ये पाळणारी लोक शोधून काढले, त्यांच्या सवयींचा अभ्यास केला तेव्हा विशेष करून ही सात पथ्ये कर्करोगापासून मुक्ती मिळविण्यास उपयुक्त ठरतात असे त्यांना दिसून आले. त्यामुळे त्यांनी आता कर्करोगापासून बचाव करण्यासाठी सात पथ्ये असे त्यांना म्हटले आहे.

या संदर्भात या संघटनेने १९८७ साली १३ हजार २५३ स्त्री पुरुषांची निवड केली आणि २० वर्षानंतर त्यातल्या २ हजार ८८० लोकांना कर्करोग झाल्याचे आढळले. निवडलेल्या लोकांतून ज्यांना कर्करोग झाला त्यांची जीवनपध्दती काय होती आणि न झालेल्यांची जीवनपध्दती काय होती याची तुलना करण्यात आली. तेव्हा असे आढळले की ही सात पथ्ये पाळणार्‍या लोकांमध्ये कर्करोग होण्याची शक्यता न पाळणार्‍या पेक्षा ५१ टक्के कमी होती. या लोकांमध्ये स्तन प्रोस्टेट ग्रंथी, ङ्गुफ्ङ्गुस यांच्या कर्करोगाचे प्रमाण प्रामुख्याने आढळले.

अमेरिकेच्या हार्ट असोसिएशनने जाहीर केलेली सात पथ्ये अशी आहेत. १. शारीरिक हालचाली टाळू नका. शक्यतो शरीराला हालचाली मिळू द्या. २. वजन नियंत्रणात ठेवा. ३. आरोग्यदायी आहार घ्या. ४. चरबीवर नियंत्रण ठेवा. ५. रक्तदाब मर्यादेत ठेवा. ६. रक्तातील शर्करा कमी करा आणि ७. धूम्रपान बंद करा. आयुष्यात निरोगी जगण्यासाठी या सात नियमांची गरज आहे. ज्या क्षणाला आपल्याला त्यांचे महत्त्व कळेल त्या क्षणापासून त्यांची अंमलबजावणी सुरू करा. त्यासाठी मुहूर्ताची वाट बघू नका. आयुष्याच्या कोणत्याही पायरीवर, कोणत्याही वर्षी हे सात नियम पाळण्याचा प्रारंभ करता येतो. शुभस्य शिघ्रम्.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही