वन-डे सीरिज जिंकण्यासाठी टीम इंडिया सज्ज

कोच्ची- टीम इंडियाने विंडीजला टेस्ट सीरिजमध्ये व्हाईटवॉश दिल्यानंतर आता वन-डे सीरिजमध्ये याचीच पुनरावृत्ती करण्याची तयारी चालवली आहे. टीम इंडियाच्या धोनी अँड कपंनीने बॅटिंग आणि बॉलिंगमध्ये विंडीजपेक्षा सरस कामगिरी केली आहे. त्यामुळे या मालिकेत देखील त्यांचाच वरचष्मा- असणार आहे. आता वन-डे सीरिजमध्येही ड्वेन ब्राव्होच्या वेस्ट इंडिज टीमला व्हाईट वॉश देण्यास टीम इंडिया आतूर असणार आहे.

टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिली वन-डे कोचीच्या नेहरु स्टेडियममध्ये रंगणार आहे. टेस्ट सीरिजमध्ये २-०ने विंडीजचा धुव्वा उडवल्यानंतर आता वन-डे सीरिजमध्ये भारतीय टीम विंडीजला पराभवाचा धक्का देण्यास आतूर असेल. सचिनच्या अखेरच्या टेस्ट सीरिजमध्ये भारतीय टीमने सांघिक खेळ करत बाजी मारली होती. आता वन-डे सीरिजमध्ये विंडीजचा धुव्वा उडवण्यास धोनी अँड कंपनी सज्ज झाली आहे.

टीम इंडियाच्या रोहित शर्मा अणि शिखर धवन या ओपनर दमदार ओपनिंग करुन देण्याचे आव्हान असेल. रोहित शर्मा सध्या ड्रीम फॉर्मममध्ये आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध डबल सेंच्युरी झळकावल्यानंतर त्यानं कोलकाता आणि मुंबई अशा दोन्ही टेस्टमध्ये सेंच्युरी झळकावली होती. आता त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा त्याच्याकडून टीमला असणार आहे. तर विराट कोहली हे धोनीचे कुठल्याही मॅचमध्ये हमखास चालणारे ट्रम्प कार्ड आहेच. याशिवाय युवराज सिंग, सुरेश रैना आणि कॅप्टन महेंद्रसिंग धोनी मिडल ऑर्डरची धुरा सांभाळणार आहेत.

गोलंदाजाची मदार रवींद्र जाडेजा आणि आर. अश्विनवर असेल. तर दुसरीकडे भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमीला वेस्ट इंडिजच्या बॅट्समनना रोखण्याचे आव्हान असेल. ख्रिस गेल भारतीय टीमसाठी धोकादायक ठरु शकतो. टेस्टमध्ये गेलची बॅट शांत होती. मात्र, गेल नावाचे वादळ एकदा का घोंगावले तर भारतीय टीमला त्याच्या तडाख्यातून वाचणे अशक्य होणार आहे. सुनील नरेन आणि नरसिंग देवनारायणपासून भारतीय बॅट्समनना सावध रहावे लागणार आहे. टेस्टमध्ये निर्विवाद वर्चस्व गाजवल्याने टीम इंडियाचा आत्मविश्वास निश्चितच दुणावलेला असणार आहे.

Leave a Comment