भाजप हा श्रीमंताचा पक्ष- राहूल गांधी

कुक्षी (धार) – गेल्या काही दिवसांपासून कॉग्रेसचे उपाध्यक्ष राहूल गांधी भाजपावर जोरदार हल्ला चढवीत आहेत. मध्य प्रदेशातील शिवराजसिंह चौहान सरकारवर हल्ला चढवताना काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजप हा श्रीमंताचा पक्ष असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून भाजप- कॉग्रेसमध्ये सुरू असलेल्या वादात आणखीनच भर पडली आहे. आता भाजपकडून हा आरोप कशाप्रकारे फेटाळला जातो हे पाहणे औचित्याेचे ठरेल.

राहुल यांनी मध्य प्रदेशातील धारच्या कुक्षी व सिंधी शहरांत प्रचारसभा घेतल्या. यावेळी पुढे बोलताना राहूल गांधी म्हणाले, ‘राज्यातील जेवढे लोक उपाशीपोटी आहेत तितके तर आफ्रिकेतही नसतील. राज्यात एक लाख बालके एक वर्षाचे वयही न गाठता उपासमारीने मृत्युमुखी पडतात. काँग्रेस हा आदिवासी, अल्पसंख्याक, दलित व गरिबांसाठीचा पक्ष आहे. भाजप मात्र श्रीमंतांचा पक्ष आहे. काँग्रेस व विरोधी पक्षांत हाच मूळ फरक आहे.’

भाजपाने गरीब व विकासादरम्यान भिंत उभी केलेली आम्ही तोडून गरीबांना प्रगतीपदावर नेऊ. राहुल यांनी आपल्या १३ मिनिटांच्या भाषणात काँग्रेसच्या घोषणापत्राचाही उल्लेख केला. राज्यात आमचे सरकार आले तर दोन लाख तरुणांना रोजगार तसेच बेरोजगार भत्ता दिला जाईल, असे आश्वासन राहुल गांधी यांनी यावेळी जनतेला दिले.