नवी दिल्ली – देशातील भ्रष्टाचाराची आणि लाचलूचपतीची अनेक प्रकरणे स्टींग ऑपरेशनच्या सहाय्याने चव्हाट्यावर आणण्याचे श्रेय असलेल्या तेहलका चे संपादक तरूण तेजपाल यांनी लैगिक दुर्वर्तन केल्याबद्दल प्रायश्चित्त घेण्याचे ठरविले आहे. या दुर्वर्तनासाठी पुढील सहा महिने संपादकपद सोडत असल्याचे तसेच कार्यालयापासून दूर राहणार असल्याचे पत्र त्यांनी सहसंपादक शोम चौधरी यांना लिहिले आहे.
तेजपाल यांनी त्यांच्या कार्यालयात काम करत असलेल्या महिला पत्रकाराचे लैगिक शोषण केल्याचा आरोप स्वीकारला असून ही पत्रकार त्यांच्या मुलीची मैत्रिण आहे. तेजपाल यांनी एकदा नव्हे तर दोन वेळा आपल्याला हैराण केल्याचे पत्र संबंधित महिलेने शोम चौधरी यांना दिले होते व या प्रकरणाची पूर्ण चौकशी करण्याची मागणी केली होती.
तेजपाल आपल्या पत्रात लिहितात की माझ्या हातून चूक घडली आणि मी तेव्हाच संबंधित महिलेची माफी मागितली आहे. मात्र आपण ज्या तत्त्वासाठी आजपर्यंत लढलो आहोत ते पाहता केवळ शाब्दिक माफी पुरेशी नाही असे वाटते. कायमची अद्दल घडेल असे कांही तरी प्रायश्चत्त मला घ्यायचे आहे आणि त्यासाठी मी संपादक पदावरून पायउतार होतो आहे. घडल्या प्रकराची पूर्ण जबाबदारी मी स्वीकारत आहे. मात्र या प्रकरणाशी तेहलकाचे नांवही जोडले असल्याने पुढील सहा महिने मी कार्यालयापासून दूर राहणार आहे.