गुरु-शिष्य संघर्ष

अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल यांचे नेमके नाते काय ? त्यांचे नाते गुरु-शिष्याचे आहे का ? निदान आता तरी अण्णांनी तशी ग्वाही दिली आहे पण त्याआधी या दोघांत एक निष्ङ्गळ वाद झाला आहे. अण्णांनी काही गरज नसताना केजरीवाल यांना अस्वस्थ केले आणि नंतर केजरीवाल हे काही आपले शत्रू नाहीत वगैगे खुलासे करत बसले आहेत. केजरीवाल यांनी अण्णा हजारे यांच्या जनलोकपाल विधेयकासाठीच्या संघर्षात हिरिरीने भाग घेतला होता. त्या निमित्ताने झालेल्या बारा दिवसांच्या उपोषणानंतर या दोघांना परस्परांचा निरोप घ्यावा लागला तेव्हा केजरीवाल यांच्या डोळयात पाणी आले. या आंदोलनामीळेच केजरीवाल देशाला समजले. अण्णा हजारे हे त्यागी आहेत, निष्कलंक आहेत, तळमळीचे कार्यकर्ते आहेत परंतु तितकेच ते अहंमन्य, एककल्ली आणि आत्मकेंद्रितही आहेत. त्यामुळे अनेक मान्यवर नेते अण्णाच्या जवळ आले, त्यांच्या चळवळीत सहभागी झाले आणि यथावकाश अण्णापासून दूर गेले. अण्णांच्या अंगात सर्वांना सोबत घेऊन जाण्याची क्षमता असती तर आजपर्यंत ते ङ्गार मोठा इतिहास घडवू शकले असते. परंतु ते एकतारीवर भजन गात बसले आहेत.

अण्णांच्या अलीकडच्या आंदोलनामध्ये विशेषतः जनलोकपाल आणि माहितीचा अधिकारी या दोन आंदोलनांमध्ये अरविंद केजरीवाल यांनी तज्ञ म्हणून आपला वाटा उचललेला आहे. या आंदोलनानंतर अण्णा आणि केजरीवाल यांच्यात मतभेद निर्माण झाले. जनलोकपाल विधेयकाचा लढा अर्धवट अवस्थेत थांबला तेव्हा अण्णा आणि त्यांचे सहकारी यांच्यामध्ये स्वतंत्र राजकीय पक्ष काढण्यावरून मतभेद झाले. अण्णा हजारे राजकीय पक्ष काढण्यास अनुकूल नाहीत मात्र अरविंद केजरीवाल यांना राजकीय पक्ष काढणे आवश्यक वाटते. दोघांमधल्या मतभेदाचा हा सर्वात मोठा मुद्दा आहे. त्यामुळे अण्णांनी केजरीवाल यांनी खुशाल आपला पक्ष काढावा परंतु आपल्या नावाचा वापर करू नये असे त्यांना बजावले होते. अर्थात, अरविंद केजरीवाल यांनीसुध्दा अण्णांचे नाव वापरले नाही. आपल्या पक्षाला अण्णांचा पाठिंबा आहे किंवा अण्णा हजारे यांच्या तत्वानुसार भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी आम आदमी पार्टीला मते द्या असा प्रचार केजरीवाल करू शकत नाहीत आणि करतही नाहीत. परंतु आपला पक्ष सत्तेवर आल्यास आपण जनलोकपाल विधेयक मंजूर करायला सरकारला भाग पाडू असा प्रचार त्यांनी केल्यास त्यात काही चूक नाही. त्यामुळे अण्णांचे नाव वापरले असा दोष त्यांच्यावर येत नाही.

मात्र अण्णा किंवा केजरीवाल यांच्यावर शाई ङ्गेकणारा अहमदनगरचा भाजपाचा कार्यकर्ता नचिकेता यांना तसे वाटत असेल तर तो त्यांचा गैरसमज आहे. जनलोकपाल विधेयकासाठी अण्णांनी आंदोलन केलेले आहे. परंतु जनलोकपाल विधेयक ही काही अण्णांची मक्तेदारी नाही. तेव्हा अरविंद केजरीवाल यांनी आपल्या पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये जनलोकपाल विधेयक आणण्याचे आश्‍वासन दिले असेल तर त्यामुळे अण्णांचे नाव वापरले असे म्हणता येत नाही. केवळ आम आदमी पार्टीच नव्हे तर कॉंग्रेस, भारतीय जनता पार्टी इत्यादी पक्षांनी सुध्दा आपापल्या जाहीरनाम्यांमध्ये लोकपाल विधेयकाचे आश्‍वासन दिलेले आहे. तेव्हा तसे आश्‍वासन दिल्यामुळे अण्णांच्या नावाचा वापर करत आहेत असा दोष त्यांना देता येणार नाही. परंतु अण्णा आणि केजरीवाल यांच्यामध्ये मतभेद निर्माण करून आम आदमी पार्टी आणि अण्णा हे दोन वेगळे आहेत असे भासवण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत. नचिकेता नावाचा भाजपाचा कार्यकर्ता हा अशा प्रयत्न करणार्‍यांपैकी एक होय. अण्णांनी या भांडणात पुन्हा भर टाकली ती अजाणतेपणाने विचारण्याचा आविर्भाव आणून विचारलेल्या एका प्रश्‍नाने. आम आदमी पार्टीच्या प्रचारासाठी जनलोकपाल आंदोलनात जमा झालेला पैसा तर खर्च केला जात नाही ना असा प्रश्‍न त्यांनी विचारला आणि विनाकारण संभ्रम पसरला.

खरे म्हणजे ते हा प्रश्‍न अरविंद केजरीवाल यांना ङ्गोन करून खाजगीत विचारू शकले असते आणि त्यांना मुळात केजरीवाल विषयी तसा भरवसा वाटायला हवा होता. परंतु या प्रश्‍नाला जाहीर वाचा ङ्गोडून त्यांनी केजरीवाल यांच्या विरोधकांच्या हातात कोलितच दिले. अरविंद केजरीवाल यांनी गेल्या काही दिवसात अनेकांना दुखवून ठेवले आहे. त्यांनी केजरीवाल यांना भ्रष्ट ठरवण्याची ही संधी साधली. ती यशस्वी झाली नाही ही गोष्ट खरी परंतु प्रचारामध्ये व्यत्यय आणण्यात तेवढेच यश मिळाले. आता मात्र अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल हे आपले शत्रू नाही वगैरे वगैरे खुलासे केले आहेत. परंतु आपल्या आत्मकेंद्रित स्वभावामुळे आपण काय घोटाळे करून ठेवतो. हे त्यांच्या आता तरी लक्षात आले असेल. अशी आशा वाटते. केजरीवाल यांच्या निवडणूक निधीविषयी भाजपा आणि कॉंग्रेसवाले सातत्याने शंका उपस्थित करत आहेत. कॉंग्रेसला तर असा अधिकार नाहीच आणि भारतीय जनता पार्टीला स्वतः सोडून इतरांचे भ्रष्टाचार ङ्गार दिसतात. त्यानुसार त्यांनीही केजरीवाल यांच्याकडे संशयाने बोट दाखवले पण केजरीवाल हे तूर्तास तरी भ्रष्टाचारात अडकणारे प्रकरण नाही. हे त्यांनाही नीट माहीत आहे.