उर्जाखात्यात 73 हजार कोटींचा घोटाळा – तावडे

मुंबई – गेल्या 10 वर्षात कोळशाच्या खरेदीतील भ्रष्टाचारामुळे जनतेकडून वाढीव वीज दर आकारून, पायाभूत सुविधांवर केलेला खर्च व्यर्थ गेल्यामुळे वीज गळती लपवून, शेतकर्‍यांच्या नावे कृषी पंपाचा खोटा वापर दाखवून सुमारे 73 हजार कोटी रुपये ऊर्जा खात्याने संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेकडून लुटले आहेत. असा आरोप करत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांना वीज खात्याच्या भ्रष्टाचाराची 2014 कागदपत्रे पुराव्यासह सादर केली.

या सर्व कागदपत्रांची राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवांमार्फत चौकशी करावी. अशी मागणी त्यांनी यावेळी केली. पावसाळी अधिवेशनात विनोद तावडे यांनी उर्जा खात्यातील भ्रष्टाचाराचा प्रश्न उपस्थित केला असता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भ्रष्टाचाराची कागदपत्रे सादर करण्याचे आव्हान दिले होते. त्यानुसार वीज खात्यातील भ्रष्टाचाराची 2014 कागदपत्रे तावडे यांनी आज उपमुख्यमंत्र्यांना सादर केली. त्यांच्यासोबत भाजपचे आमदार सरदार तारासिंग, अ‍ॅड. आशिष शेलार यांच्यासह बारा आमदार उपस्थित होते.

त्यानंतर पत्रकारांशी बोलताना तावडे यांनी महाजनको या कंपनीमार्फत नवीन औष्णिक विद्युत प्रकल्प व जुन्या संचाच्या देखभाल दुरुस्तीमध्ये जवळपास 20 हजार 963 कोटी रुपयांचा खर्च निष्फळ झाला आहे. स्वस्त:त देशी कोळसा उपलब्ध असताना तो निकृष्ट दर्जाचा असल्याचे दाखवून गेल्या सहा वर्षात महानिर्मिती या कंपनीच्या माध्यमातून 4 हजार 867 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचे त्यांनी सांगितले.

चंद्रपूर, परळी आदी औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातून होणार्‍या विजेचे उत्पादन 2004-05 च्या तुलनेत घटलेले असतानाही फर्नेस ऑईलच्या वापर दुप्पटीने वाढला आहे. त्याचप्रमाणे मिठाच्या खरेदीतही मोठ्या प्रमाणात अतिरिक्त खरेदी झाल्याचे दिसून येत असल्याचे तावडे यांनी सांगितले. 2012-13 या वर्षात जवळपास 4 हजार कोटी रुपयांची वीज गळती लपविण्यात आली. गेल्या 13 वर्षात अशाच प्रकारे जवळपास 30 हजार कोटी लपविण्यात आले. वीज चो-या व भ्रष्टाचाराच्या माध्यमातून महावितरणने जवळपास 53 हजार कोटी रुपयांना ग्राहकांना फसविण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

Leave a Comment