पाच कोटी भारतीय महिलांना गुगल करणार इंटरनेट साक्षर

आगामी वर्षात पाच कोटी महिलांना इंटरनेट साक्षर करण्याचा उपक्रम इंटरनेट जायंट गुगलने हाती घेतला असून त्यासाठी एचयुएल, अॅक्सिस बँक  व इंटेल यांचे सहकार्य घेण्यात येत असल्याचे गुगल इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक राजन आनंदन यांनी सांगितले.

ते म्हणाले की भारतात सध्या २० कोटी इंटरनेट युजर आहेत. पैकी ६ कोटी महिला आहेत. मात्र भारताची या क्षेत्रात जी घोडदौड चालू आहे ती पाहता पुढच्या वर्षात इंटरनेट युजरची संख्या २८ कोटींवर जाईल असा अंदाज औद्योगिक सर्वेक्षकांनी दिला आहे. त्यामुळे भारत यूएसला मागे सारून दोन नंबरच्या स्थानावर येणार आहे. हे लक्षात घेऊन महिल सबलीकरणासाठी आम्ही हा उपक्रम हाती घेतला आहे.

महिला सबलीकरणात इंटरनेट महत्त्वाची भूमिका बजावू शकते. यामुळे महिलांना आत्मविश्वास येतो तसेच आपली मते खुलेपणाने मांडण्यासाठीचे व्यासपीठ उपलब्ध होते. इंटरनेटमुळे जगातील नवीन संधी त्यांना कळतील तसेच शिक्षण मिळविण्यासाठीही त्याचा उपयोग होणार आहे. यामुळे आम्ही  जागरण मोहिम हाती घेतली असून किमान ५ कोटी महिलांना इंटरनेट साक्षर बनविण्याचे ठरविले आहे. त्यासाठी देशभरात इंटरनेट इझी अॅक्सिस दिला जाणार असून महिलाना इंटरनेटसंबंधी हवी असलेली माहिती व त्यांच्या शंका यांचे निरसन करण्यासाठी १८००-४१-९९९७७ या टोल फ्री नंबरवर हेल्पलाईन सुरू केली आहे.

Leave a Comment