श्वासावरून ओळखता येणार रक्तातील शर्करेचे प्रमाण

लंडन – मधुमेही म्हणजेच डायबेटिस असलेल्या व्यक्तींचे जगातील प्रमाण दिवसेनदिवस वाढत चालले आहे. या लोकांना रक्तातील साखरेची पातळी वारंवार तपासावी लागते व त्यासाठी रक्ताचा नमुना द्यावा लागतो. म्हणजेच रक्त काढण्यासाठी टोचून घ्यावे लागते. त्यांचा हा त्रास कायमचा दूर होण्याची शक्यता नवीन संशोधनामुळे निर्माण झाली आहे. आता रक्तातील साखरचे प्रमाण संबंधित व्यक्तीच्या श्वासावरून ओळखता येईल असे उपकरण ब्रिटनच्या न्यू इंग्लंड विद्यापीठातील वैज्ञानिकांनी तयार केले आहे. ब्रेथ अॅनालायझर असे या उपकरणाचे नामकरण केले गेले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मानवी शरीरात असलेल्या किटोन्सचा वापर शरीरातील इन्शुलिनची पातळी जेव्हा कमी होऊ लागते तेव्हा केला जातो. अॅसीटोनप्रमाणेच असलेले हे किटोन्स इन्शुलिनची पातळी कमी होऊ लागली की त्यांच्यातील फॅट जाळायला लागतात. इन्शुलिन कमी झाल्याने साखरेची पातळी वाढते. किटोन्स प्रमाणेच असलेले अॅसिटोन ही पातळी किती कमी अथवा जास्त आहे हे सांगू शकतात. त्यासाठी बनविलेल्या उपकरणत दोन नॅनोमीटर ( पॉलिमर) चा वापर केला गेला आहे. त्यामुळे श्वासातील अॅसीटोनची परिक्षा केली जाते व साखरेचे प्रमाण किती आहे ते निश्चित करता येते असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.

अर्थात या उपकरणाच्या चाचण्या सध्या सुरू असून त्यानंतरच ते बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकणार आहे. मात्र या उपकरणामुळे मधुमेहींना सुया टोचून घेण्याच्या त्रासातून कायमची मुक्ती मिळणार आहे.

Leave a Comment