नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला गर्दीच्या ठिकाणी पुरेसा बंदोबस्त ठेवून लोकांचे संरक्षण करण्याच्या बाबतीत नोटीस पाठविली आहे. ऍडव्होकेट विनित धांडा यांनी दाखल केलेल्या एका याचिकेच्या संदर्भात ही नोटीस पाठविण्यात आली आहे. गर्दीच्या ठिकाणी विशेषत: धार्मिक स्थळांच्या ठिकाणी लोकांच्या संरक्षणासाठी पुरेसे उपाय योजण्यासाठी सरकारला न्यायालयाने सूचना द्याव्यात, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये भारतातल्या तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे. परंतु या गर्दीला शिस्तीत दर्शन घेता यावे तसेच चेंगराचेंगरीसारखे प्रकार घडून लोक मरू नयेत, यासाठी अशा ठिकाणी पुरेशी संरक्षण व्यवस्था ठेवण्याची गरज आहे. मात्र या सरकार याबाबत बेङ्गिकीर आहे. म्हणून ऍडव्होकेट धांडा यांनी ही याचिका दाखल केली आहे.
चेंगराचेंगरीच्या एवढ्या घटना घडल्या असूनही सरकारी यंत्रणा त्या संबंधात सावध झालेली नाही आणि याबाबत आपण काही तरी वेगळे उपाय योजिले पाहिजेत अशी जाणीव शासन व्यवस्थेत निर्माण झालेली नाही. त्यामुळे ऍड. धांडा यांनी न्यायालयाच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे. केवळ धार्मिक स्थळेच नव्हे तर चित्रपटगृहे, दवाखाने, बाजार, न्यायालये आणि हॉटेल्स् या ठिकाणी सुद्धा अशा सुरक्षा व्यवस्थांची गरज असल्याचे श्री. धांडा यांनी म्हटले आहे.