नवी दिल्ली- भारताचे मंगळयान यशस्वीरीत्या अवकाशात झेपावल्यानंतर अवघ्या दोन आठवडयातच नासाचे आणखी एक यान मंगळाच्या दिशेने झेपावले. हे यान मंगळावरील वातावरण नष्ट होण्यामागचे कारण आणि पाण्याची विपुलता याबाबत संशोधन करणार आहे. हे ‘मार्स अॅ टमॉस्फीअर अॅँड व्होलेटाइल इव्हॉल्यूशन’ (माव्हेन) हे अंतराळ यान मंगळवारी फ्लोरिडा येथील केप कॅनव्हेराल हवाई दलाच्या तळावरून अवकाशात झेपावले.
अवकाशत झेपावल्यानंतर ५३ मिनिटाने हे यान प्रक्षेपक अटलास व्ही सेंटॉरपासून वेगळे झाला. त्यांनतर जवळपास सात मिनिटाने यानातील सौर ऊर्जेची प्रणाली कार्यान्वित झाली. यामुळे या यानाला ऊर्जेचा पुरवठा होणार आहे. माव्हेनचा मंगळाच्या दिशेने प्रवास सुरू झाला असून, १० महिन्याच्या प्रवासानंतर पुढील वर्षातील सप्टेंबर महिन्यात ते मंगळावर उतरेल असे नासातर्फे सांगण्यात आले.
दरम्यान मंगळावरील अभ्यासासाठी यापूर्वी नासाने पाठवलेले ऑर्बिटर्स आणि रोव्हर या यानांसोबत काम करणार असल्याचे नासाचे प्रशासक चार्लस बोल्डेन यांनी सांगितले. या मोहिमेंतर्गत मंगळाच्या ज्या भागावर अद्याप सूर्याची किरणे पोहोचू शकली नाहीत. त्या भागाचे गूढ उकळण्याचे कार्य यातून करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.पुढील चार आठवडयांमध्ये माव्हेन ऊर्जा मिळवून त्यातील आठ भागांची तपासणी करणार आहे. सप्टेंबरमध्ये माव्हेन मंगळावर पोहोचल्यानंतर यानामार्फत मंगळावर सहा अग्निबाणातर्फे स्फोट घडवण्यात येणार आहे. या स्फोटांपूर्वी, स्फोटावेळी व स्फोटानंतर होणारे बदल यानामार्फत टिपण्यात येणार आहेत.