ऑगस्टा वेस्ट लँड करार रद्द

नवी दिल्ली – भारत सरकारने वादग्रस्त ठरलेला ऑगस्टा वेस्ट लँड हेलिकॉप्टर खरेदी करार रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे. १२ हेलिकॉप्टरच्या खरेदीचा हा व्यवहार ३,५४८ कोटी रुपयांचा होता. भारताची संरक्षण सामुग्री खरेदी करताना दलाली दिली वा घेतली जाऊ नये असा नियम असतानाही या व्यवहारात ३६२ कोटी रुपयांची दलाली दिली गेल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे हा करार रद्द करण्यात येत आहे.

या प्रकरणात दलाली दिली गेल्याचे आरोप समोर आले, तेव्हा सरकारने संरक्षण मंत्री ए.के. अँटनी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून या व्यवहाराची चौकशी केली. या समितीने ३० ऑक्टोबरला आपला अहवाल सादर केला असून या अहवालात दलाली दिली गेली असल्याच्या शक्यतेला दुजोरा दिला. त्यामुळे सरकारने हा व्यवहार रद्द करण्याचे ठरवले आहे. ही हेलिकॉप्टर्स हवाई दलासाठी खरेदी केली जाणार होती.

संरक्षण खात्याने २१ ऑक्टोबरलाच कंपनीला नोटीस बजावली होती आणि हा व्यवहार का रद्द करू नये, अशी विचारणा करून कंपनीला उत्तर देण्यास तीन आठवड्याची मुदत दिली होती. तत्पूर्वी ङ्गेब्रुवारी महिन्यात या कंपनीचे पेमेंट थांबविण्यात आले होते. या व्यवहारामध्ये भारतीय हवाई दलाचे निवृत्त प्रमुख एस.पी. त्यागी यांच्यासह काही लोकांनी दलाली घेतली, असा आरोप आहे.