आम आदमी पार्टीचा निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध

नवी दिल्ली- दिल्लीतील ७० विधानसभा मतदारसंघांसाठी ७० निवडणूक जाहीरनामे प्रसिद्ध करण्याचा अनोखा उपक्रम अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने राबविला आहे. भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाचे प्रणेते व जनलोकपाल विधेयकासाठी आंदोलन केलेले अण्णा हजारे व केजरीवाल यांच्यातील खुला वाद नुकताच झाल्याच्या पार्श्वभूमीवर हा जाहीर नामा प्रसिद्ध केला जात आहे.

अण्णांचे एकेकाळचे सहकारी अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली निवडणूक प्रचारात अण्णांचे जनलोकपाल विधेयक सत्तेवर आल्यास मंजूर करून घेऊ असे वक्तव्य केल्याने अण्णा नाराज झाले आहेत. पत्रकार परिषदेत ही नाराजी व्यक्त करताना अण्णा म्हणाले की जनलोकपाल पार्लमेंटमध्ये यायला हवे, दिल्ली विधानसभेत येऊन काय उपयोग? त्यातही माझ्या नावाचा वापर त्यांनी निवडणूक प्रचारात केला हे चुकीचे आहे.

आम आदमी पार्टीने जाहीरनाम्यात दिल्ली विधानसभेत जनलोकपाल विधेयक संमत करण्यास सर्वाधिक प्राधान्य दिले आहे. त्याचबरोबर मध्यमवर्गीय व गरीब कुटुंबासाठी ७०० लिटर मोफत पाणी, आत्ताच्या निम्या दरात वीजपुरवठा, अनधिकृत वसाहती नियमित करण्याचे आश्वासन आणि दिल्ली वासियांसाठी परवडणारी घरे असे मुद्दे घेतले आहेत. मात्र प्रत्येक मतदारसंघातील अडचणी आणि प्रश्न पाहून त्यानुसार वेगवेगळे जाहीर नामे तयार केले आहेत.

Leave a Comment