दुरांतो गाड्या बंद होणार

नवी दिल्ली – पश्‍चिम बंगालच्या विद्यमान मुख्यमंत्री आणि भूतपूर्व रेल्वेमंत्री यांच्या हट्टापायी सुरू करण्यात आलेल्या दुरांतो रेल्वेगाड्या बंद होण्याची शक्यता आहे. रेल्वेचा तोटा कमी करण्याच्या उपायाचा एक भाग म्हणून या गाड्या बंद केल्या जातील, असे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.

ममता बॅनर्जी यांनी रेल्वेमंत्री असताना या ६० नॉन स्टॉप रेल्वेगाड्या सुरू केल्या होत्या. त्या दोन मोठ्या स्थानकांच्या दरम्यान एकही थांबा न घेता धावत होत्या. त्याशिवाय या गाड्यांचे तिकीटही जास्त होते, कारण त्यात जेवण दिले जात होते आणि राजधानी एक्स्प्रेससारख्या सगळ्या सोयी होत्या. नॉन स्टॉप प्रवास असल्यामुळे या दुरांतो गाड्यातील २५ ते ३० टक्के बर्थ कायम मोकळे रहात होते आणि गाड्या तोट्यात चालत होत्या.

या तोट्याचा विचार करून रेल्वेने चेन्नई ते तिरुवनंतपुरम् तसेच चेन्नई ते कोईमतूर या दोन दुरांतो गाड्या येत्या ३ तारखेपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अजमेर ते हजरत निजामोद्दीन ही दुरांतो गाडी आता दरम्यानच्या स्थानकांवर थांबविण्यात येणार आहे. सहा दुरांतो गाड्या नेहमीच्या सुपर ङ्गास्ट गाड्यांप्रमाणेच पळविण्यात येणार आहेत. दुरांतो गाड्यांचे काही डबे अन्य गाड्यांना जोडण्यात येणार आहेत.