समयोचित सन्मान

सचिन तेंडूलकर आणि डॉ. सी. एन. आर. राव यांना भारत सरकारने जाहीर केलेली भारतरत्न पदवी केवळ उचितच आहे असे नाही तर समायोजितही आहे. कारण ती योग्य वेळी जाहीर झाली आहे. सचिन २४ वर्षांच्या म्हणजे दोन तपांच्या खेळानंतर निवृत्त होत असतानाच त्याला हा किताब जाहीर झाला तर भारताचे मंगळ यान मंगळाकडे झेपावून त्याची तंत्रज्ञानातली उपयोगिता सिद्ध झाल्यानंतर लगेच या मोहिमेचे खरे शिल्पकार डॉ. राव यांनाही हा किताब जाहीर झाला. भारत सरकारने पहिल्यांदाच असे योग्य वेळवर काम केले असावे. सरकारचे अभिनंदन. सचिन तेंडुलकर खेळाडू म्हणून जेवढा श्रेष्ठ आहे तेवढाच तो माणूस म्हणूनही परिपक्व आहे. सचिन तेंडूलकर हा खेळाडू आहे. त्यातच तो क्रिकेटपटू आहे. भारतातले लोक क्रिकेटवेडे असल्यामुळे आणि सचिन तेंडूलकर हा सतत प्रसिध्दीच्या झोतात राहत असल्यामुळे त्याला भारतरत्न किताब देण्याची मागणी झाली. परंतु भारतात या किताबाचे मानकरी होण्याची पात्रता असणारे इतरही अनेक लोक आहेत. अशी प्रत्येक व्यक्ती प्रसिध्दीच्या शिखरावर असेलच असे काही सांगता येत नाही. मात्र त्यांचे काम कमी मोलाचे असते असे नाही. सचिनबरोबरच भारतरत्न किताब जाहीर झालेले डॉ. सी. एन. आर. राव हे नाव सामान्य माणसाला माहीतसुध्दा नव्हते.

मात्र त्यांची पात्रता, योग्यता या क्षेत्रात एवढी मोठी आहे की त्यांना विज्ञानाच्या क्षेत्रातले सचिन म्हटले गेले. त्यांनाही सरकारने भारतरत्न किताबजाहीर केला आहे. विज्ञानाला, संशोधनाला आणि विज्ञान प्रसाराला पूर्णपणे समर्पित असलेले डॉ. राव यांचा उचित गौरव झाला आहे. डॉ. राव हे भारताने नुकत्याच अवकाशात सोडलेल्या मंगळ यानाचे शिल्पकार आहेत. ४० वर्षे वयाचा सचिन हा देशातला हा सर्वोच्च किताब मिळवणारा पहिला खेळाडू आणि सर्वात कमी वयाचा मानकरी ठरला आहे. त्यामुळे केवळ सचिनचीच प्रतिष्ठा वाढली आहे असे नव्हे तर क्रीडापटूला भारतरत्न किताब दिला जातो हे समजल्याने क्रीडा क्षेत्राचीही प्रतिष्ठा वाढली आहे. सध्याच्या काळात खेळाला म्हणावी अशी प्रतिष्ठा नाही. त्यामुळेच आजपर्यंत भारतरत्न किताब देण्यासाठीच्या निकषांमध्ये खेळाचा समावेश केलेला नव्हता. आता हे निकष बदलले आहेत, खेळाडूला भारतरत्न किताब जाहीर झाला आहे. सचिन तेंडुलकरने केवळ भारतरत्न मिळवला आहे एवढेच नाही तर खेळाच्या प्रतिष्ठेतही भर घातली आहे. भारतरत्न हा किताब जन्मभर केलेल्या कामासाठी असतो आणि तो शक्यतो साठी-पासष्ठीच्या पुढे शक्यतो ऐंशी वर्षे उलटल्यानंतर आणि काही वेळा तर मरणोपरांत दिला जात असतो.

सचिनने केवळ वयाच्या ४० व्या वर्षी हा सन्मान मिळवला आहे. त्यामुळे तरुणांच्या मनात सुद्धा सन्मानाची भावना निर्माण झाली आहे. सचिनने आपल्या कारकिर्दीतला शेवटचा सामना काल खेळून पुरा केला. या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा पराभव तर केलाच पण या शेवटच्या सामान्यात सचिनने शानदार ७७ धावा केल्या. त्याची ही निरोपाची क्रिकेट मॅच संपताच त्याला हा किताब देण्याची घोषणा करण्यात आली आहे. सचिनने २०० कसोटी सामन्यांत १५९२१ धावा तसेच एक दिवसीय सामन्यांत त्याने ४६३ सामने खेळून १८४२६ धावा जमवल्या आहेत. जगातला सर्वात श्रेष्ठ क्रिकेटपटू म्हणून ज्यांचा गौरव केला जातो त्या डॉन ब्र्र्रॅडमन यांनीही सचिनला क्रिकेटमधला देव असे म्हणून त्याचा गौरव केला आहे. जगात आजवर सचिनवर अनेकांनी अनेक प्रकारची शब्द सुमने उधळली आहेत पण त्याचा सर्वात मौल्यवान गौरव कोणता असेल तर तो ब्र्र्रॅडमन यांनी केलेला आहे. एका सर्वोच्च पदावर असलेल्या क्रिकेटच्या खेळाडूने विक्रमादित्य सचिनची स्तुती करतानाही जगातल्या सर्वात श्रेष्ठ अशा देवाची उपमा दिली आहे. भारत सरकारनेही सर्वोच्च किताब जाहीर करून असाच गौरव केला आहे.

डॉ. सी.एन.आर. राव ऊर्ङ्ग चिंतामणी नागेश रामचंद्र राव (वय-७९ वर्षे) हे पंतप्रधानांच्या शास्त्रीय सल्लागार परिषदेचे अध्यक्ष आहेत. घनस्थिती रसायन शास्त्र आणि संरचनात्मक रसायन शास्त्र या विषयावरील संशोधनात ते जगभर प्रसिद्ध आहेत. भारतरत्न किताब मिळविणारे डॉ. राव हे तिसरे शास्त्रज्ञ ठरले आहेत. यापूर्वी १९५४ साली डॉ. चंद्रशेखर व्यंकट रमण आणि १९९७ साली डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम या दोन शास्त्रज्ञांना देशातल्या या सर्वोच्च मानाच्या प्रतिष्ठेच्या नागरी किताबाने सन्मानित करण्यात आलेले आहे. डॉ. राव यांना यापूर्वी म्हणजे गतवर्षीच पद्मविभूषण किताब देण्यात आला होता. सचिन तेंडूलकरच्या भारतरत्नमुळे मेजर ध्यानचंद यांच्या संबंधात पुन्हा प्रश्‍न निर्माण होणार आहेत. कारण मेजर ध्यानचंद यांना सचिन तेंडूलकरप्रमाणेच हॉकीच्या क्षेत्रात जागतिक मान्यता होती. सचिनला भारतरत्न देण्याची चर्चा सुरू झाली तेव्हा ध्यानचंद यांचेही नाव पुढे आले होते. किंबहुना हा किताब आधी ध्यानचंद यांना आणि नंतर सचिनला द्यावा असेही काही लोकांनी म्हटले होते. कधी का असेना पण ध्यानचंद यांनाही हा पुरस्कार दिला गेला पाहिजे.

Leave a Comment