सचिनला भारतरत्न देण्याचा निर्णय राहुल गांधींचा?

नवी दिल्ली – क्रीकेट कसोटीतून २०० सामने खेळून निवृत्त होतानाच सचिन तेंडुलकरला भारतरत्न देण्याचा निर्णय काँग्रेसचे महासचिव राहुल गांधी यांच्या सूचनेनुसार घेतला गेला असल्याचे अंतर्गत सूत्रांकडून समजते. अर्थात त्यामागे सचिन प्रेम नसून आगामी निवडणुका आणि देशातील युवा मतदारांचा विचार असल्याचेही सांगितले जात आहे. सचिनला भारतरत्न देण्याचा निर्णय अतिवरीष्ठ पातळीवर काँग्रेस पक्षात घेतला गेला असेही या सूत्रांकडून सांगितले गेले आहे.

सचिन आज देशातील युवा पिढीचा आयकॉन आहे. त्याला आत्ताच भारतरत्न दिले गेले नाही तर भाजप कडून ही मागणी केली जाईल. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार मोदी यांनी मागेच ही मागणी केली आहे आणि आत्ता त्यांनी त्यासाठी आग्रह धरला तर त्याचा फायदा निवडणुकांत भाजपला मिळेल म्हणून राहुल गांधी यांनी हा सर्वोच्च नागरी पुरस्कार सचिनला देण्याचा आग्रह धरला होता. परिणामी सचिन कसोटी खेळण्यासाठी उतरला आणि त्याच्या निवृत्तीचा क्षण येताच ही घोषणा केली गेली. इतकेच नव्हे तर आपला प्रचार दौर्‍याचा व्यस्त कार्यक्रम सोडून राहुल मुंबईत वानखेडेवर उपस्थित राहिले.

पंतप्रधानांनी शनिवारी शास्त्रज्ञ राव यांना भारतरत्न देण्याची शिफासर राष्ट्रपतींकडे केली व अर्ध्या तासात सचिन आणि राव यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्याची अधिकृत घोषणा केली गेली. यापूर्वी राज्यसभेवर सचिनची नियुक्ती करताना राष्ट्रपतींनी शिफारस केल्याचे भासवले गेले असले तरी त्यामागे प्रत्यक्षात सोनिया गांधी यांचा हात होता. यातून सचिन काँग्रेसच्या कुटुंबातील असल्याचे भासविण्याचा प्रयत्न पक्षाकडून केला जात आहे. परिणामी निवडणुकांत युवा मतदारांची मते काँग्रेसकडे वळू शकतील अशी पक्षाला आशा आहे.

Leave a Comment