सचिनची तुलना कोणाशीही होत नाही- गांगुली

कोलकाता – मास्टर ब्लास्टार सचिन तेंडुलकरची तुलना इतर कोणाशीही होऊ शकत नाही. फुटबॉलच्या दुनियेत लिजेंड मॅरेडोनाचे जे स्थान आहे, तेच क्रिकेटमध्ये सचिनचे स्थान आहे, अशी प्रतिक्रिया टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने व्यक्त केली.

यावेळी बोलताना गांगुली म्हणाला, ‘सचिनने आपली दोनशेवी कसोटी खेळल्यानंतर क्रिकेटला अलविदा म्हटले. आपल्या अखेरच्या कसोटीत सचिनने केलेली ७४ धावांची खेळीसुद्धा दमदार ठरली. ही खेळी नेहमीसाठी चाहत्यांच्या आठवणीत असेल. सचिन ब-याच वेळा नेमकी बाजू घेत नाही किंवा स्पष्ट बोलत नाही, असा त्याच्यावर यापूर्वी आरोप व्हायचा. मात्र, त्याच्या निवृत्तीच्या भाषणाने त्याने सर्वांची तोंडे बंद केली आहेत’.

आगामी काळात सचिनशिवाय क्रिकेट सुने होईल. गेल्याा तीन वर्षांत सचिनच्या बॅटमधून अपेक्षेप्रमाणे कामगिरी झाली नाही. फायनल इनिंगमध्ये केलेली फलंदाजी ही त्याच्या गेल्या तीन वर्षांतील सर्वोत्तम कामगिरी होती. मला सचिनचा अभिमान आहे. आम्ही दोघे गेली अनेक वर्षे सोबत खेळलो. आम्ही जवळपास १५ वर्षे आनंदात घालवली. ते सर्व दिवस अत्यंत आनंददायक होते. आम्ही कधीही नंबरसाठी खेळलो नाही, असे गांगुलीने नमूद केले.

Leave a Comment