संसदेत इंग्रजीला बंदी घाला : मुलायमसिंग

इटावा – समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायमसिंग यादव यांनी खासदारांना संसदेत इंग्रजीतून बोलण्यावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी केली आहे. शनिवारी आपल्या या मतदारसंघातील एका सभेत बोलताना त्यांनी ही मागणी केली. जगातले सर्व विकसित देश त्यांच्या प्रतिनिधीगृहांमध्ये त्यांच्या मातृभाषेतूनच व्यवहार करतात, त्यामुळे भारतात सुद्धा संसदेत हिंदीतूनच चर्चा झाली पाहिजे असे प्रतिपादन त्यांनी केले.

हिंदी सेवा ट्रस्ट या संघटनेतर्ङ्गे हिंदी भाषेच्या वृद्धीकरिता परिश्रम घेणार्‍या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला मुलायमसिंग यादव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विकसित देशाचा आदर्श समोर ठेवून भारताने हिंदी भाषेला प्रोत्साहन दिले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

आपल्या देशातले पुढारी हिंदी भाषेच्या बाबतीत नेहमीच दुतोंडी व्यवहार करतात. जनतेला मते मागण्यासाठी ते हिंदीत भाषणे करतात, पण याच जनतेने निवडलेल्या सभागृहात मात्र ते इंग्रजीमध्ये भाषणे ठोकतात. हे ढोंग थांबले पाहिजे असे ते म्हणाले. मात्र हे प्रतिपादन करताना आपण इंग्रजीचे शत्रू नाही, असाही खुलासा त्यांनी केला.