
नवी दिल्ली – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि प्राध्यापक सीएनआर राव यांना भारतरत्न पुरस्कार मिळाल्यावर, आता भाजपने सवाल उपस्थित केला आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना भारतरत्न का देण्यात आला नाही, असा सवाल भाजप नेते रवीशंकर प्रसाद यांनी विचारला आहे. ते छत्तीसगडमध्ये बोलत होते. सचिन आणि सीएनआर राव यांना मी शुभेच्छा देतो. ते देशांचे रत्न आहेत. ते भारतरत्नसाठी पात्र आहेत. मात्र अटल बिहारी वाजपेयींना हा पुरस्कार का नाही, असा सवाल प्रसाद यांनी केला. अटलजींना भारतरत्न द्या, अशी मागणी मी करत नाही. या सरकारचे अजून फक्त 200 दिवस शिल्लक आहेत. त्यानंतर भाजपचं सरकार येणार आहे. त्यावेळी अटलजींचा उचित सत्कार केला जाईल, असंही रवीशंकर प्रसाद यांनी सांगितले.
