भारतरत्न सर्व मातांना समर्पित – सचिन तेंडुलकर

मुंबई- मला मिळालेला भारतरत्न पुरस्कार हा देशातील सर्व माता ज्या आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी झटतात त्यांना मी समर्पित करतो, असे भावपूर्ण उद्गार भारतरत्न पुरस्कार प्राप्त सचिन तेंडुलकरने काढले. भारतरत्न पुरस्कार मिळाल्यानंतर पहिल्यांदाच पत्रकार परिषदेला सामोरे आलेल्या सचिनने पत्रकारांच्या वेगवेगळया प्रश्‍नांना उत्तरे दिली.

गेल्या 24 वर्षांपासून देशासाठी क्रिकेट खेळणे माझ्यासाठी खूप महत्वाची गोष्ट राहिली आहे. मी आयुष्यातील 75 टक्के क्रिकेटसाठी दिले आहेत. निवृत्त होण्याची हीच योग्य वेळ होती. शारीरिक मर्यादाही आल्या होत्या. आतून आवाजही आला की हीच योग्य वेळ आहे, त्यामुळे मी निवृत्ती जाहीर केली. मी टीमचा हिस्सा असेल नसेल पण ह्दयात कायम भारत असेल, असे सचिनने म्हटले. मला मिळालेला भारतरत्न पुरस्कार माझ्या आईबरोबर सर्व मातांना अर्पित करतो ज्यांनी आपल्या मुलांसाठी त्याग केला. मला वाटते भारताने प्रत्येक खेळात विजय मिळवला पाहिजे.

निवृत्त झालो असलो तरी क्रिकेटशी कोणत्या कोणत्या प्रकारे मी जोडलेलाच असेल, कशा पद्धतीने याचा अद्याप विचार केलेला नाही. परंतु, युवा पिढीला मार्गदर्शन करणे मला आवडेल. तसेच यावेळी बोलताना सचिन म्हणाला, ’अर्जुनवर दबाव टाकू नका, त्याला क्रिकेटचा आनंद घेऊ द्या. भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्याने हे वक्तव्य केले आहे. एक पिता म्हणून मी बोलेन की प्रत्येक वेळी अर्जुनवर दबाव नको, खेळण्यासाठी मी त्याच्यावर दबाव टाकत नाही, असं सचिन तेंडुलकर पत्रकारांना म्हणाला.

सचिन म्हणाला की, ’त्याच्या वडिलांची कामगिरी चांगली होती, म्हणून अर्जुनची कामगिरीही तशीच हवी, असे दडपण त्याच्यावर नको. माझ्यावरही असा दवाब असता तर माझ्या हातात पेन असता, क्रिकेट बॅट नाही, कारण माझे वडिल प्राध्यापक होते.’ ’अर्जुनने स्वत: क्रिकेट निवडलं आहे आणि तो क्रिकेटबद्दल अतिशय पॅशनेट आहे. त्यामुळे सध्या त्याला क्रिकेट एन्जॉय करु द्या,’ असं सचिनने स्पष्ट केले आहे.

Leave a Comment