फेसबुकच्या सहाय्याने मोबाईलवर उमेदवारांची माहिती

नवी दिल्ली – भारतात होत असलेल्या आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांतील उमेदवारांची साद्यंत माहिती युजरला त्यांच्या मोबाईलवर फेसबुकच्या माध्यमातून व तीही मोफत दिली जाणार आहे. असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म व फेसबुक यांच्या परस्पर सहकार्यातून ही योजना आकारास आली आहे.

या नुसार युजरने *३२५ #असे त्याच्या मोबाईलवरून डायल केले की त्याला मेनू मिळेल त्यातून इलेक्शन मेनू सिलेक्ट करायचा आहे. त्याबरोबर त्याला हव्या असलेल्या उमेदवारांची पूर्ण माहिती मिळू शकणार आहे. यात उमेदवाराचे गुन्हेगारी रेर्कार्ड, आर्थिक, शैक्षणिक तसेच व्यावसायिक माहिती थेट मोबाईलवरच दिसू शकेल. त्यासाठी कोणताही वेगळा चार्ज द्यावा लागणार नाही. यासाठी यूएसएसडी तंत्रज्ञानाचा वापर केला गेला आहे. या तंत्रज्ञानामुळे फेसबुक मोबाईलवर इंटरनेट शिवायही अक्सेस होऊ शकते. हवी असलेली माहिती टेक्स्ट स्वरूपात मिळणार आहे.

भारतात दररोज सरासरी ८२ दशलक्ष नागरिक फेसबुक पाहतात त्यातील बहुसंख्य युजर मोबाईलचा वापर त्यासाठी करतात. युवा पिढीला मतदान करताना आपण कोणत्या उमेदवाराला मत द्यायचे याचा निर्णय करण्यासाठी अशी माहिती मिळाली तर त्याला निर्णय घेणे सोपे होईल या विचारातून ही योजना आखल्याचे फेसबुक इंडियाचे संचालक व पब्लिक पॉलिसी प्रमुख अंखी दास यांनी सांगितले तर नागरिकांनी मतदान करताना कोणत्याही प्रभावाखाली करण्यापेक्षा डोळसपणे करावे व योग्य उमेदवाराची निवड करावी यासाठी हा प्रयत्न असल्याचे असोसिएशन ऑफ डेमॉक्रॅटिक रिफॉर्मचे संस्थापक त्रिलोचन शास्त्री यांनी सांगितले.

Leave a Comment