चारधाम यात्रा संपली

डेहराडून – गंगोत्री ,यमुनोत्री, केदारनाथ व ब्रदीनाथ या हिमालयातील चार धाम यात्रेची सांगता सोमवारी म्हणजे आज होत असून आज सायंकाळी ब्रदीनाथाच्या मंदिराची दारे बंद केली जाणार आहेत. यानंतर या यात्रेची सांगता होईल. यंदाच्या वर्षात जूनमध्ये झालेल्या मुसळधार पाऊस व ढगफुटीमुळे ही यात्रा तीन महिने खंडितच झाली होती ती आक्टोबरमध्ये पुन्हा सुरू करण्यात आली होती.

दर वर्षी हिवाळ्यात या चारही मंदिरांचे दरवाजे चार महिन्यांसाठी बंद केले जातात. बद्रिनाथ केदारनाथ कमिटीने दिलेल्या माहितीनुसार परंपरा अशी आहे की दिवाळीच्या दुसर्‍या दिवशी गंगोत्रीचे दरवाजे प्रथम बंद होतात. त्यानंतर पाठोपाठ यनुमोत्री आणि केदारनाथाचे दरवाजे बंद केले जातात व सर्वात शेवटी बद्रिनारायण मंदिर बंद होते. आता हे दरवाजे पुन्ंहा अक्षयतृतीयेदिवशी उघडले जातील.

यंदाच्या वर्षी बद्रिनाथाला पाच लाखांपेक्षा कमी भाविक आले होते. गतवर्षी ही संख्या जवळजवळ दहा लाखांवर होती. केदारनाथ परिसराला यंदाच्या वर्षी ढगफुटी व पुराचा प्रचंड फटका बसला असला तरीही यंदा येथे ३ लाख १२ हजार भाविकांनी भेट दिली. गतवर्षी ही संख्या सहा लाखांवर होती. गंगोत्रीला दोन लाख भाविकांनी तर यनुनोत्रीला २ लाख ३२ हजार भाविकांनी भेट दिली. दरवर्षी या यात्रेसाठी देशविदेशातून प्रचंड प्रमाणावर भाविक आणि पर्यटक येत असतात. या भागाचे अर्थकारण या यात्रांवरच बरेचसे अवलंबून असते असेही समजते.