खरसिया – गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि काँग्रेसमध्ये सुरू असलेला आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला आजही कायमच आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी छत्तीसगडमधील खरसिया येथील सभेत भाजप चोरांचा पक्ष असल्याचा आरोप केला. तसेच एखाद्या चोराप्रमाणे छत्तीसगडमधील नैसर्गिक संपत्ती ते लुटत आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे. त्यांच्या या आरोपामुळे भाजपाने निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे.
यावेळी सभेप्रसंगी पुढे बोलताना राहूल गांधी म्हणाले, ‘नंदकुमार पटेल यांच्या मुलाकडे मी एकच गोष्ट मागतो आहे. मला एक नाही तर ५०० नंदकुमार पटेल हवेत. मी ते दिल्लीतून नाही आणणार तर इथे उपस्थित असलेल्या लोकांमधूनच ते हवेत, जे ठामपणे उभे राहतील आणि भाजपसारख्या चोराला बाहेर फेकतील. २५ मे रोजी जिराम घाटी येथे पटेल मारले गेले. युवकांना शिक्षण नाही, महिलांना सुरक्षितता नाही, ही परिस्थिती असल्याचा आरोप त्यांनी केला.’ काँग्रेसच्यावतीने पटेल यांचा मुलगा उमेश पटेल हा खरसिया मदारसंघातून निवडणूक लढवत आहे.
दरम्यान, राहुल यांनी भाजपला चोर म्हटल्यानंतर लगेचच याप्रकरणी भाजपने निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. राहुल हे सराईत गुन्हेगार असून पक्षाकडून सतत या देशातील कायद्याचे आणि आचारसंहितेचे उल्लंघन केले जात आहे, असे भाजपने राहुल यांच्याविरोधात केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. तर दुसरीकडे, काँग्रेसला खुनी पंजा म्हटल्याप्रकरणी काँग्रेसने भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आयोगाकडे केलेल्या तक्रारीला उत्तर देण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी मोदींना चार दिवसांची मुदतवाढ दिली आहे.