वॉशिंग्टन – सध्या रशियाच्या राजकीय आश्रयात लपलेल्या एडवर्ड स्नोडेन याने सुमारे 2 लाख अतिसंवेदनशील कागदपत्रे उघड केल्याचे राष्ट्रीय सुरक्षा संस्थेचे अर्थात एनएसएचे प्रमुख किथ अलेक्झांडर यांनी सांगितले आहे. स्नोडेन हा अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा संस्थेचा (एनएसए) माजी कंत्राटदार आहे.
स्नोडेनने अतिसंवेदनशील कागदपत्रे जगजाहीर करु नयेत म्हणून अमेरिका कोणते उपाय योजत आहे, असे किथ अलेक्झांडर यांना बाल्टीमोर येथे एका पत्रकार परिषदेत विचारण्यात आले. त्यावेळी स्नोडेन याने सुमारे दोन लाख कागदपत्रे माध्यमांना दिल्याचे केथ अलेक्झांडर यांनी सांगितले.
हवाई येथील राष्ट्रीय सुरक्षा संस्थेच्या कार्यालयात सकेडेन याने सुमारे एक महिनाभर काम केले. या काळात त्याने या कर्मचार्यांचे पासवर्ड-लॉगिन मिळवून लक्षावधी कागदपत्रे मिळविल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे राष्ट्रीय सुरक्षा संस्थेच्या अब्रुचे धिंडवडे निघाले आहेत.
भारत, इटली, फ्रान्स, ग्रीस, जपान, दक्षिण कोरिया, मेक्सिको आणि तुर्कस्तान या देशांसह 38 देशांमधील वेगवेगळ्या स्वरूपातील माहिती राष्ट्रीय सुरक्षा संस्थेने गोळा करण्याचा प्रयत्न केला असल्याचे वृत्त स्नोडेन याच्या हवाल्याने एका ब्रिटीश वृत्तपत्राने दिले होते. यामुळे अमेरिका आपल्या मित्रदेशांना वा सहकार्यांनाही हेरगिरीतून वगळत नसल्याचे स्पष्ट झाले होते.