चहावाला पंतप्रधान होणार?

भारतात लोकशाही अवतरली तेव्हा कॉंग्रेसच्या नेत्यांना काही अशिक्षित लोकांनी लोकशाही म्हणजे काय असा प्रश्‍न विचारला होता. त्यावेळी त्या नेत्यांनी, लोकशाही म्हणजे लोकांचे राज्य असे उत्तर दिले होते. त्यापूर्वी भारतामध्ये संस्थानिकांचे आणि राजांचे राज्य होते. लोकशाही आल्यामुळे ते राज्य संपेल आणि लोकांनी निवडून दिलेल्या सामान्य माणसाचे राज्य येईल असा त्यांच्या म्हणण्याचा अर्थ होता. परंतु लोकशाहीची मूळ संकल्पना मागे पडली. लोकांना गांधी-नेहरू घराण्याच्या आरत्या ओवाळण्याची सवय लागली आणि बघता बघता या देशाच्या लोकशाहीला दिल्लीपासून गल्ली पर्यंत घराणेशाहीचे ग्रहण लागून लोकशाहीची मूळ संकल्पना झाकोळून गेली. खरे म्हणजे सामान्यातल्या सामान्य माणसातून नेतृत्व उभे राहणे हीच लोकशाहीची खरी कसोटी आहे. परंतु अजूनही जुनाट विचारामध्ये रमलेले काही लोक लोकशाहीची ही कल्पना स्वीकारत नाहीत कारण त्यांना ती मानवत नाही. आपल्या पेक्षा गरीब कुटुंबात जन्मलेल्या आणि जातीच्या उतरंडीत मानलेल्या खालच्या जातीत जन्मलेल्या व्यक्तीला आपला नेता म्हणण्याचा दिलदारपणा या लोकामध्ये अजून येतच नाही. खरे म्हणजे जन्म कुठे व्हावा हे आपल्या हातात नसते. कर्तबगारी दाखवून मोठे होणे हे आपल्या हातात असते.

संस्कृतमध्ये एक वचन आहे. ‘दैवायत्ते कुले जन्मे, मदायत्तम् तु पौरुषम’. म्हणजे आपण कुणाच्या पोटी जन्म घ्यावा हे ठरवू शकत नाही. जन्म आपल्या हातात नाही. परंतु पुरुषार्थ करून स्वतःला प्रयत्नांनी मोठे करणे हे मात्र आपल्या हातात आहे. याची प्रचिती आपल्याला नेहमीच येत असते. तथाकथित मोठ्या कुटुंबात जन्माला येऊन कित्येक मुले वाया जातात आणि अतीशय गरीब कुटुंबात जन्मा येऊनही काही लोक पुरुषार्थ गाजवतात. असे झाले नसते तर सगळेच श्रीमंत लोक कायम श्रीमंतच राहिले असते आणि सगळे गरीब लोक कायम गरीब राहिले असते. किंबहुना आपल्या जुन्या जीवनपध्दतीत तोच प्रघात होता. लोकशाहीने मात्र माणसाच्या कर्तबगारीला आणि स्वातंत्र्याला वाव दिला. म्हणून साठ वर्षात आपल्या देशामध्ये सामान्य कुटुंबात जन्मलेले नेते. देशाचे भवितव्य घडविण्यात मोठा वाटा उचलू शकले. ही लोकशाहीची खासियतच आहे. परंतु अजूनसुध्दा उच्चवर्णीय गंड न गेलेले अनेक लोक देशात आहेत. ज्यांना सामान्य माणसाचा उत्कर्ष देखवत नाही. लोकशाही म्हणजे लोकांनी, लोकांसाठी चालवलेली लोकांची राज्यपद्धती. ही लोकशाहीची सर्वात समर्पक व्याख्या मानली जाते.

ज्या अमेरिकेतली लोकशाही सर्वात जुनी मानली जाते त्या देशातल्या एकोणिसाव्या शतकातल्या एका अध्यक्षांनी ही व्याख्या केली आहे. या अध्यक्षांचे नाव अब्राहम लिंकन. लिंकन हा एका शेतमजुराचा मुलगा होता. अमेरिकेने त्याला अध्यक्ष केले पण त्या देशात कोणी नरेश अग्रवाल नव्हता. त्यामुळे एका शेतमजुराचा मुलगा अध्यक्ष कसा होऊ शकतो असा प्रश्‍न विचारला नाही. नरेश अग्रवाल नावाचे उत्तर प्रदेशातले एक नेते आहेत. ते मात्र एका चहावाल्याचा मुलगा भारताचा पंतप्रधान होण्याची इच्छा बाळगून आहे याचे ङ्गार वाईट वाटायला लागले आहे. हे नरेश अग्रवाल नेमके कोण याचा शोध घ्यायच्या प्रयत्नात कोणी न पडेलेले बरे. कारण ते अनेक पक्षात ङ्गिरून आता सपा मध्ये आले आहेत. पण त्यांना भारताच्या लोकशाहीचा मूळ वैचारिक आधार समजलेला नाही. खरे सांगायचे तर त्यांना तो आधार पचलेला नाही. भारतात अजूनही अनेक सरंजामी प्रवृत्तीचे नेते आहेत आणि त्यांना देशाचे नेतृत्व गरीब माणसाने करावे ही कल्पना मानवत नाही. भारताच्या लोकशाहीचा आधार असलेली राज्य घटना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केली आहे ते काही थोर घराण्यात जन्माला आलेले नव्हते. ते दलित कुटुंबात जन्माला आले. ज्या काळात देशात अस्पृश्यता कठोरपणे पाळली जात होती त्या काळात ते देशात शिकले.

परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेऊन आले आणि त्यांनी हे सिद्ध करून दाखवले की, देशाचे भवितव्य ठरवणारी घटना तयार करणार नव्या दमाचा नवा मनू व्हायचे असेल तर त्यासाठी श्रीमंताच्याच घरात जन्माला आले पाहिजे असे काही नाही. लोकांनी लोकांसाठी चालवलेल्या राज्यपद्धतीत लोकांचे नेतृत्व करण्यासाठी राजघराण्यात जन्माला आले पाहिजे अशी काही अट नाही. उलट हा नेता जेवढा सामान्य कुटुंबात जन्माला आला असेल तेवढी लोकशाही बळकट होईल. महात्मा गांधींनी लोकशाहीची व्याख्या करताना ङ्गार चांगली गोष्ट सांगितलेली आहे. ज्या दिवशी या देशात भंग्याची मुलगी राष्ट्रपती होईल त्या दिवशी या देशात खरी लोकशाही आली असे मी समजेन असे महात्मा गांधी म्हणाले होते. गांधीजींना जे समजले ते नरेश अग्रवालला समजणे शक्य नाही. कारण लोकशाही आली असूनही अजून सरंजामशाहीत रमणारे अनेक लोक आपल्या देशामध्ये आहेत. नरेश अग्रवाल सध्या समाजवादी पार्टीत आहेत आणि त्यांचे नेते मुलायमसिंग यादव हे एका शेतकर्‍याच्या पोटी जन्माला येऊन शिक्षकी करून राजकारणात आलेले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली काम करताना नरेश अग्रवाल यांना त्यांची गरिबी आडवी येत नाही. मोदींच्याच गरिबीचे मात्र वैषम्य वाटते.

Leave a Comment