बंगळुरू – कर्नाटकाच्या बेळगाव जिल्ह्यात शनिवारी पहाटे झालेल्या मालमोटारीच्या अपघातात २१ मजूर ठार झाले. या लोकांना घेऊन जाणारी ही मालमोटार बेळगाव ते बंगळुरू मार्गावर उलटली आणि या वाहनात बसून चाललेले मजूर मरण पावले. हा अपघात पहाटे ५.३० वाजता झाला. वाहन चालकाला झोप अनावर झाल्यामुळे त्याला एका वळणावर वाहनाचा वेग कमी करण्यास सुचले नाही आणि त्यामुळे गाडी पलटली, असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.
ही मालमोटार कर्नाटकाच्या यादगिर जिल्ह्यातून महाराष्ट्रातल्या सवदत्ती येथे जात होती. ती हालकी येथे एका वळणावर पलटली. या गाडीत ३५ लोक प्रवास करीत होते. त्यात काही महिला आणि लहान मुलेही होती. त्यातील २१ जण मारले गेले आणि १४ जण जखमी झाले. हे सर्व मजूर होते आणि यादगिर जिल्ह्यातून सुरपूर येथून सवदत्ती येथे मजुरीसाठी जात होत्या.
दोनच दिवसापूर्वी कर्नाटकामध्ये आरामबसला लागलेल्या आगीत ७ जण मरण पावले आहेत आणि त्यापूर्वी आंध्र प्रदेशात असाच अपघात होऊन ४५ जण जळून मरण पावले आहेत. या भागात सतत होणार्या अपघातांमुळे लोकांत चिंता व्यक्त केली जात आहे कारण प्रवास असुरक्षित झाला आहे.