आज नौदलात ‘विक्रमादित्य’ युद्धनौकेचा समावेश होणार

नवी दिल्ली – भारतीय नौदलाची शान असलेल्या आयएनएस ’विक्रांत’च्या निवृत्तीनंतर, तितक्याच तोलामोलाची असलेली विमानवाहू युद्धनौका आयएनएस ‘विक्रमादित्य’ उद्या (शनिवारी) भारतीय नौदलात दाखल होत आहे. त्यामुळे भारताच्या सागरी सामर्थ्यात वाढ होणार असल्याचे मानले जात आहे.

रशियात शनिवारी होणार्‍या कार्यक्रमात भारताचे संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांच्या उपस्थितीत विक्रमादित्य भारताकडे सुपूर्द केली जाणार आहे. संरक्षणमंत्री अ‍ॅण्टनी आणि संरक्षण सचिव आर. के. माथूर एका उच्चस्तरीय शिष्टमंडळासमवेत रशियाच्या चार दिवसीय भेटीवर रवाना झाले आहेत. लष्करी तांत्रिक सहकार्य करारानुसार आयएनएस ‘विक्रमादित्य’ भारताला सुपूर्द करण्याच्या कार्यक्रमाबरोबरच भारत-रशिया यांच्या संरक्षणविषयक संयुक्त परिषदेचे अध्यक्षस्थान अँटनी भूषविणार आहेत.

रशियाचे संरक्षणमंत्री सर्जी शोयगू या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारच्या कार्यकाळात 2004 मध्ये ‘विक्रमादित्य’चे कंत्राट देण्यात आले होते. गेल्या नऊ वर्षांत ही युद्धनौका मिळण्यात वारंवार विलंब लागला असून, तिची किंमत वाढत गेली आहे. सेव्हरोडिन्स्क येथील सेव्हमॅश या बंदरात शनिवारी ही युद्धनौका भारताकडे सुपूर्द केली जाणार आहे.

या कार्यक्रमाला रशियाचे उपपंतप्रधान दिमित्री रोगोझीन उपस्थित राहणार आहेत. लष्करी तांत्रिक सहकार्यानुसार आयोजित संरक्षणविषयक परिषदेत अँटनी यांच्यासह शिष्टमंडळातील सचिव (संरक्षण उत्पादन) जी. सी. पाटी, महासंचालक (सामग्री खरेदी) एस. बी. अग्निहोत्री आणि लष्करातील वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत. संरक्षण सहकार्य वाढविण्याबाबतही चर्चा होईल. प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर दोन्ही देश एकमेकांच्या मतांचे आदानप्रदान या वेळी करतील.