सचिनला अखेर भारत रत्न किताब जाहीर

नवी दिल्ली – लाखो क्रिकेट शौकिनांच्या गळ्यातला ताईत झालेल्या सचिन तेंडुलकरला अखेर भारत रत्न हा सर्वोच्च नागरी किताब जाहीर झाला आहे. राष्ट्रपती भवनाचे प्रवक्ते वेणू राजगोपाळ यांनी एक निवेदन प्रसिद्धीस देऊन ही घोषणा केली. ४० वर्षे वयाचा सचिन हा देशातला हा सर्वोच्च किताब मिळवणारा पहिला खेळाडू आणि सर्वात कमी वयाचा मानकरी ठरला आहे.

या आधी राजीव गांधी यांना वयाच्या ४७ व्या वर्षी हा किताब देण्यात आला होता. सचिनने आपल्या कारकिर्दीतला शेवटचा सामना काल खेळून पुरा केला. या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा पराभव तर केलाच पण या शेवटच्या सामान्यात सचिनने शानदार ७७ धावा केल्या. त्याची ही निरोपाची क्रिकेट मॅच संपताच त्याला हा किताब देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

सचिनने २०० कसोटी सामन्यांत १५९२१ धावा करून जगातला सर्वात यशस्वी ङ्गलंदाज असा मान मिळवला आहे. एक दिवसीय सामन्यांतही त्याने ४६३ सामने खेळून १८४२६ धावा जमवल्या आहेत. १०० शतके करून शतकांचे शतक करणारा क्रिकेटपटू असाही मान त्याने मिळवला आहे. तो गेल्या वर्षी राज्यसभा सदस्यही झाला आहे. त्याला भारत रत्न किताब देण्यात यावा अशी मागणी देशभरातून केली जात होती. अखेर सरकारने त्याला या किताबाने सन्मानित करण्याचे ठरवले आहे.

Leave a Comment