शीला दीक्षित यांची मालमत्ता २.७ कोटींची

नवी दिल्ली- मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना भरलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची मालमत्ता २ कोटी ७० लाख रूपयांची असल्याचे भरले आहे. विशेष म्हणजे गेल्या पाच वर्षात त्यांची मालमत्ता दुप्पट झाली आहे.२००८ च्या विधानसभा निवडणुकांवेळी भरलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची मालमत्ता १ कोटी ३० लाख रूपये असल्याचे नमूद केले गेले होते. न्यू दिल्ली विधानसभा मतदारसंघातून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

शीला दीक्षित यांच्याकडे बँक डिपॉझिट, कॅश, म्युच्युअल फंड गुंतवणूक, शेअर अशी १ कोटी ८० लाख रूपयांची जंगम असून ९८ लाख रूपये किमतीचा फ्लॅट आहे. त्यांच्याकडे स्वतःचे वाहन नाही.

भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार हर्षवर्धन यांची मालमत्ता त्यांच्या पत्नीच्या मालमत्तेसह २ कोटी ६६ लाख रूपये असून त्यात दोन वाहने, ३५ तोळे सोने, दोन किलो चांदी, हिर्‍याची अंगठी, साधारण ९ लाख रूपये रेाख असा तपशील दिला गेला आहे. त्यांच्यावर तीन गुन्हेगारी खटलेही दाखल असल्याचा उल्लेख प्रतिज्ञापत्रात केला गेला आहे.