चहावाला पंतप्रधान कसा होऊ शकेल?

लखनौ – समाजवादी पार्टीचे नेते नरेश अग्रवाल यांनी नरेंद्र मोदी यांच्या व्यवसायाची चिकित्सा केली असून एक चहा विकणारा मुलगा देशाचा पंतप्रधान म्हणून कसा कारभार करू शकेल, असा सवाल केला. चहाची विक्री करून पोट भरणार्‍या माणसाकडे देशाचा कारभार करण्याचा व्यापक दृष्टीकोन कसा असू शकेल, असे नरेश अग्रवाल यांनी म्हटले आहे. एखाद्या शिपायाला पोलीस अधीक्षक केले तर चालेल का? त्याच्याकडे पोलीस अधीक्षक म्हणून आवश्यक तो दृष्टीकोन असणे शक्य नाही असे अग्रवाल म्हणाले.

देशाचा पंतप्रधान होणारा माणूस हा व्यापक दृष्टीकोनाचा आणि राष्ट्रव्यापी प्रतिमा असणारा असला पाहिजे, असे नरेश अग्रवाल यांनी एका जाहीर सभेत बोलताना म्हटले. नरेंद्र मोदींच्या सभेला खूप गर्दी होते, परंतु एखादा मदारी सुद्धा गर्दी जमा करू शकतो. गर्दी जमा करणे अवघड नाही, अशा कठोर शब्दात अग्रवाल यांनी मोदी यांच्यावर टीका केली.

नरेंद्र मोदी आपल्या जाहीर सभांमधून आपण चहा विकत होतो असे सांगतात. त्याचा समाचार अग्रवाल यांनी घेतला. नरेंद्र मोदी यांचे विचार मुख्यमंत्र्यांसारखे आहे पंतप्रधान पदासारखे नाही, असे ते म्हणाले. भारतीय जनता पार्टीची संभावना एका विधवा स्त्रीशी केली. ग्रामीण भागात एक म्हण आहे, विधवा स्त्रीचा आशीर्वाद मागू नये, कारण ती आशीर्वाद मागणार्‍याला तिच्यासारखे होण्याचा आशीर्वाद देते. नरेश अग्रवाल यांच्या या असभ्य वक्तव्यावर भारतीय जनता पार्टीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Leave a Comment