कॅन्सरच्या पेशी अचूक टिपणारा कॅमेरा

जर्मन वैद्यानिकांनी कर्करोगाच्या अतिसूक्ष्म पेशीही टिपू शकेल असा कॅमेरा तयार करण्यात यश मिळविले असून यामुळे कर्करोगाच्या शस्त्रक्रियेत आमूलाग्र बदल घडून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. फ्राऊनहोफर संस्थेतील डेलियोलानिस व त्यांच्या सहकार्‍यानी हा कॅमेरा तयार केला आहे.

कॅन्सरच्या रूग्णाची शस्त्रक्रिया करताना अनेकवेळा कर्करेागाच्या अतिसूक्ष्म पेशी रक्तातून शरीराच्या अन्य भागात जातात व तेथे पुन्हा कर्करोग होतो. शस्त्रक्रिया करताना सर्जनला नक्की कोणत्या पेशी निरोगी आहेत व कोणत्या पेशी कर्करोगग्रस्त आहेत हे ठरविण्यासाठी मोठे कौशल्य लागते मात्र बरेचवेळा निरोगी पेशी रोगग्रस्त पेशींपासून अलग करणे अवघडच असते. संशोधकांनी तयार केलेला कॅमेरा मात्र अशा छुप्या रोगग्रस्त पेशी अचूक शोधू शकणार आहे. व त्यामुळे त्या पूर्णपणे काढून टाकणेही शक्य होणार आहे.

मेंदूच्या कर्करोगात तर हा कॅमेरा वरदानच ठरणार आहे. कर्करोगाच्या पेशी रंगीत प्रकाशात या कॅमेर्‍यात चमकतात व त्यामुळे त्या चटकन शोधता येतात. मेंदूच्या कर्करोगात शस्त्रक्रिया करताना कर्करोग नक्की कुठे सुरू झाला आहे व त्याची व्याप्ती किती आहे, कुठून निरोगी पेशी सुरू होत आहेत याचा तपास या कॅमेर्‍यामुळे लावता येणार आहे. कारण या शस्त्रक्रियेत लाल डायचा वापर केला जात असतो व कॅमेरा हा डाय सहज टिपू शकतो. मेंदूतील पेशी काढताना अतिशय काळजी घेणे गरजेचे असते कारण मेंदूतील पेशी एकदाच तयार होतात त्या नव्याने तयार होत नाहीत असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

Leave a Comment