पिंक स्टार हिर्‍याची ८३० लाख डॉलर्सला विक्री

लंडन – पिंक स्टार नावाने ओळखल्या जाणार्‍या गुलाबी रंगाच्या व बोराच्या आकाराच्या अप्रतिम हिर्‍याला लंडन येथील लिलावात विक्रमी ८३० लाख डॉलर्सची किमत मिळाली असून आजपर्यंत कोणत्याही हिर्‍याला अथवा जेमला मिळालेली ही सर्वाधिक किंमत आहे. ६० कॅरट वजनाचा हा हिरा न्यूर्यार्क येथील प्रसिद्ध हिरे कटर इसाक वुल्फ यांनी खरेदी केला असल्याचे लिलावकर्ते सोयबे ऑक्शनर यांनी जाहीर केले आहे.

सोयबे ऑक्शनर यांनी सांगितले की आजपर्यंत लिलावात जगात कोणत्याही रंगाच्या रत्नापेक्षा पिंक स्टारला मिळालेली किमत सर्वाधिक आहे. खरेदीदार वुल्फ ने या हिर्‍याचे नामकरण पिंक ड्रीम म्हणजे गुलाबी स्वप्न असे केले आहे. यापूर्वी गुलाबी रंगाच्या हिर्‍याला सोयबे जिनिव्हा ऑक्शनर यांच्या तर्फे २०१० साली ४६.२ दशलक्ष किवा ४६२ लाख डॉलर्स किमतीला विक्री केली गेली होती हा हिरा ग्राफ पिंक नावाने ओळखला जात होता.

पिंक स्टार किवा आता पिंक ड्रीम हा जगातला एक दुर्मिळ हिरा आहे. कारण गुलाबी रंगाचे इतक्या मोठ्या वजनाचे हिरे दुर्मिळ असतात. डी बिअर्स कंपनीने आफ्रिकेतील खाणीतून १९९९ ला हिरा काढला तेव्हा त्याचे वजन १३२ कॅरट होते. त्यानंतर दोन वर्षे त्याचे कटिंग आणि पॉलिश सुरू होते. असे हिरे लिलावात क्वचितच विक्रीला येतात असेही सांगितले जात आहे.