उत्तम झोपेसाठी आहार

झोप येत नसेल तर वांगे खा, असा एक वाक्प्रचार मराठीत रूढ आहे. वांगे खाल्ल्याने झोप येते, असा अनुभव आल्या-वरूनच तो रूढ झाला असावा. आपल्या आहारामध्ये जड पदार्थ आले की, त्या आहारानंतर झोप येते. पुरणाची पोळी, श्रीखंड, आंब्याचा रस यांचे जेवण झाले की सुरसुरी येते. परंतु शास्त्रज्ञांनी आता या अनुभवाच्या खोलात जाऊन आहार आणि झोप यांचा संबंध शोधून काढण्यास सुरुवात केली आहे. जड अन्नपदार्थ खाल्ले की, ते पचनास अवघड असल्यामुळे पचनशक्तीला ओव्हरटाईम करून त्यांना पचवावे लागते. शरीरातला रक्तप्रवाह पचनसंस्थेकडेच धावायला लागतो. त्यामुळे मेंदूचा रक्तपुरवठा कमी होऊन डोळे पेंगुळायला लागतात. हा जड अन्नाचा तात्पुरता परिणाम असतो. एकदा ते अन्न पचन झाले की, मग रक्तपुरवठा सामान्य होतो आणि माणूस ताजातवाना होतो. परंतु आता शास्त्रज्ञ आहाराचा जो संबंध तपासत आहेत तो थोडा वेगळा आहे.

काही लोक कायम भरपूर झोपणारे असतात तर काही लोक कायमच कमी झोपणारे असतात. या दोन प्रकारच्या लोकांच्या आहारात काय ङ्गरक असतो आणि कोणत्या आहारामुळे त्यांच्या या सवयीवर कसा परिणाम होतो याचा आता शोध घेतला जात आहे. नॅशनल हेल्थ ऍन्ड न्यूट्रिशन एक्झामिनेशन सर्वे असे एक सर्वेक्षण जाहीर झाले आहे. केंद्र सरकारच्या एका खात्याने हे संशोधन प्रायोजित केले आहे. तेव्हा असे आढळले की, ज्यांच्या आहारामध्ये अनेक प्रकारचे पदार्थ असतात त्यांची झोप दीर्घ असते आणि ज्यांच्या खाण्यामध्ये मोजकेच पदार्थ असतात त्यांची झोप आखूड असते.

काही लोकांना जेवणामध्ये दोन भाज्या, आमटी, दही, एक-दोन चटण्या, सलाड, पापड असे पदार्थ लागतात. त्या लोकांच्या शरीरामध्ये कार्बोहायड्रेटस्, प्रथिने, जीवनसत्वे आणि अनेक प्रकारची मुलद्रव्ये आपोआपच जातात आणि सोबतच एखादा स्निग्ध पदार्थ असला की, सगळ्या प्रकारच्या अन्नद्रव्यांचा त्यांच्या शरीराला लाभ होतो. अन्नपदार्थांचे एकूण प्रमाण जास्त असण्यापेक्षा त्यामध्ये विविधता असण्याने पचन अवघड जाते. या उलट काही लोक भरपूर जेवले तरी एक भाजी आणि पोळी एवढेच पदार्थ खातात. जेवण भरपूर, पण विविधता कमी. अशा लोकांना पचन सोपे जाते आणि त्यांची झोपही कमी असते.