पुणे , स्वत:च्या आईलाआणि देशालाही विकून खाणार्यापासून देश वाचवण्यासाठी नरेंद्र मोदी यांना दोन तृतियांश मताधिक्याने पंतप्रधान बनविण्याची आवश्यकता आहे. त्या सरकारला एनडीएच्या कुबड्यावर अवलंबून राहता लागता कामा नये, याची काळजी मतदारांनीच घेतली पाहिजे, असे सुप्रसिद्ध कन्नड साहित्यिक डॉ एस एल भैरप्पा यांनी पुण्यात प्रबोधन मंचच्या गप्पाच्या कार्यक्रमात बोलताना सांगितले. गेल्या साठ पासष्ट वर्षात येथील राज्यकर्त्यांनी कमी कष्टात अफाट श्रीमंत होण्याच्या हव्यासापायी केवळ देश विकला आहे, असे नव्हे तर आपल्या आईलाही विकले आहे.
मोदी कोणी परमेश्वराचा अवतार आहे, असे नव्हे पण सध्याच्या अतिशय गर्तेत गेलेल्या स्थितीतून देशाला बाहेर काढण्याचे सामर्थ्य त्यांच्यात निश्चित आहे, असेही त्यांनी बोलून दाखविले. या कार्यक्रमाला पुण्यातील निरनिराळ्या क्षेत्रातील अभ्यासक व विचारवंत मंडळी उपस्थित होती. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यानंतर डॉ भैरप्पा यांनीही मोदींचा असा उल्लेख केल्याने त्याला महत्व आले आहे.
ऑइन्स्टाईनच्या पूर्वी काही हजार वर्षे सापेक्षतावादाचा सिद्धांत मांडणारे व त्याचाही व्यापक अर्थाने विचार करणारे शंकराचार्य या देशात होते.येथे नास्तिकवादीही अध्यात्मवादी असू शकतो आणि आस्तिकही अध्यात्माखेरीज अन्य क्षेत्रात रस घेणारा असू शकतो. येथे वेद, उपनिषदे व ब्रह्मसूत्रे यांची प्रस्थानत्रयी हा जीवनाचा सिद्धांत असू शकते आणि चार्वाक, बुद्ध, जैन, शीख, वैशाषिक आणि न्याय हेही एकमेकाशी मतभेद असूनही एकत्र राहू शकतात. जगातील कोणत्याही धर्मात ही लोकशाही नाही. तेथे नास्तिक माणूस अध्यात्मवादी असूच शकत आही. सार्या जगातील जाणकार व विचारवंत माणसे हा विचार स्वीकारण्याच्या मानसिकतेत आहेत. पण येथे मताच्या लोभापायी काहीही करायला तयार असणारांची सुलतानशाही आधी संपविली पाहिजे.
आपले तत्वज्ञान महान होते तर मग गेल्या एक हजार वर्षात या देशावर आलेली परचक्राची आक्रमणे आपण थोपवू शकलो नाही ही वस्तुस्थितीही आपल्याला नाकारता येत नाही. म्हणून यापुढे जे आपले आहे ते तर घेतलेच पाहिजे आणि सात्विक तेज आणि क्षात्रतेज यांचे सामर्थ्य वाढवून ते टिकवले पाहिजे, असे त्यांनी बोलून दाखविले.
काँग्रेसवाल्यांचा सर्वात मोठा दोष कोणता असेल तर त्यांनी मताच्या बेरीज वजाबाकीसाठी या देशाचा इतिहास नाकारला. आणि आपल्या मायदेवतांची आणि देशाला प्रेरणा देणार्या माताभगिनींची नागडी उघडी चित्रे काढलेल्या एम एफ हुसेन याने काढली व जगभर वाटली पण आपल्या राज्यकर्त्यांनी केवळ मतासाठी ‘तो मोठा मानवतावादी होता’ असे म्हणण्यात धन्यता मानली. त्याने त्यांच्या धर्मातील चित्रे अशी व्यंग असलेली काढली नाहीत हे आपण लक्षात ठेवले पाहिजे, आपले सारे राजकारण दांभिक झाले आहे आणि ते आपणालाच नीट करावे लागणार आहे.
मराठीने कानडीला दिला या सहस्त्रकातील मोठा साहित्यिक
दोन दिवसापूर्वी पुण्यात डॉ गिरीश कर्नाड यांचा मुक्काम होता आणि त्यांनी त्यांच्या भाषणात असा उल्लेख केला की, मराठीने कानडीला वाङमय आणि नाटक दिले, यात किती तथ्य आहे, असे विचारता ते म्हणाले, यात बरेच तथ्य आहे. मूळचे मराठी असलेले व कानडीत मोठी आणि चांगली ग्रंथरचना केलेल्यांची संख्या फार मोठी आहे. त्यातील द रा बेंद्रे हे एकच जरी नाव घेतले तरी त्यांची उंची महान आहे. गेल्या एक हजार वर्षातील सर्वात मोठी प्रतिभावान म्हणून कुमार व्यास यांचा उल्लेख होतो. बेंद्रे हे त्या तोडीचे प्रतिभावंत होते. त्यांच्या वाङमयाच्या मुळाक्षरावरच आम्ही घडलो. पण ज्यांना ते मूळचे मराठी की कानडी असा वाद घालायचा आहे, त्यांना सांगून ठेवतो की, त्यांनी आपले बरेचसे वाङमय मराठीत पाठवले होते. त्याला वाचक मिळाले नाहीत.
यातील खरी गंमत तर पुढेच आहे. जी स्थिती मराठीची आहे तीच स्थिती तामिळ व तेलगूची आहे. त्यांच्या त्यांच्या भाषेत फार ओळखल्याही न जाणार्या अनेक लेखकांनी कानडी वाङमयाला अशा उंचीवर नेवून ठेवले आहे की, त्यांचे नंतर त्यांच्या मातृभाषेत भाषांतरीत झालेले वाङमय तेथे लोकप्रीय झाले पण त्यांचा परिचय हा कानडी लेखक असाच राहिला. पण याच विषयावरच जर परिसंवाद होवू लागले तर आपल्या हातात फक्त शकसंवतांच्या सनावळी आणि पुस्तकांच्या पत्रावळीच राहतील. त्यातील ते प्रतिभावंत हरवून जातील. आता माझ्या अनेक कादंबर्यांची अनेक भाषात भाषंातरे झाली आहेत. मला तर त्या त्या भाषेतील लेखक म्हणून ओळखण्याचा मान मिळत आहे पण त्या लेखकांना त्यांच्या मातृभाषेचा परिचय मिळाला नाही याची माझ्या मनात खंत आहे.