नवी दिल्ली – निवडणूक आयोगाने कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या भाषणातील भाषा, आविर्भाव आणि आशय यांच्याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली असून यापुढे निवडणूक प्रचाराची भाषणे करताना या तिन्ही बाबतीत त्यांनी सावधानता बाळगावी, अशी त्यांना समज दिली आहे. राजस्थान आणि मध्य प्रदेशातल्या प्रचार सभांमध्ये राहुल गांधी यांनी केलेल्या काही विधानांच्या अनुरोधाने निवडणूक आयोगाने हा इशारा त्यांना दिला आहे.
भारतीय जनता पार्टीने राहुल गांधी यांच्या या विधानांमुळे निवडणूक आचारसंहितेचा भंग झाला असल्याचा आरोप केला होता आणि तशी तक्रार निवडणूक आयोगाकडे पाठविली होती. निवडणूक आयोगाने तिची दखल घेऊन राहुल गांधी यांना नोटीस पाठविली होती आणि राहुल गांधी यांनी या नोटिशीला चौदा पानी उत्तर पाठविले होते. त्याला प्रतिसाद म्हणून निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना हा इशारा देणारे पत्र लिहिले आहे.
निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांची विधाने, त्यांची भाषा आणि ही विधाने करतानाच आविर्भाव निवडणूक आचार संहितेच्या भूमिकेशी अनुरूप नाही, असा शेरा मारला आहे. दरम्यान, भारतीय जनता पार्टीने राहुल गांधी यांनी पाठविलेल्या चौदा पानी उत्तरावर प्रतिक्रिया व्यक्त केली असून तिच्यात राहुल गांधी यांनी जातीयवादाच्या संदर्भात कसलाच खुलासा केला नाही, हे निदर्शनास आणून दिले आहे.