मोटोरोलाचा स्वस्त स्मार्टफोन मोटो जी बाजारात दाखल

गुगल या इंटरनेट क्षेत्रातील जायंट सर्च इंजिन कंपनीने अधिग्रहण केलेल्या मोटोरोला  हँडसेट उत्पादक कंपनीने बुधवारी ब्राझिल आणि युरोपच्या कांही भागात त्यांचा नवा मोटो जी हा स्वस्त स्मार्टफोन सादर केला असून त्याची किमत १७९ डॉलर्स आहे. या फोनला वायरलेस सर्व्हीस कॉन्ट्रॅक्ट उपलब्ध नसल्याचे समजते.

जगातील सर्वात मोठ्या चीनच्या स्मार्टफोन बाजारात हा फोन कंपनी विकू शकणार नाही मात्र तरीही अॅपल व सॅमसंग या बलाढ्य कंपन्यांशी स्पर्धा करण्यास मोटोरोला तयार आहे असे कंपनीचे चीफ एक्झिक्युटिव्ह डेनिस वुडसाईड यांनी सांगितले. कंपनी भारत, ब्राझिल या विकसनशील बाजारपेठांवर लक्ष केंद्रीत करणार असल्याचे सांगून ते म्हणाले की अॅपलच्या नव्या आयफोन सी ५ च्या किमतीच्या १/३ किमतीतच आमचा फोन ग्राहकांना मिळणार आहे. पाश्चिमात्य देशातील बजेट बायर म्हणजेच थोडक्या किमतीत खरेदी करू इच्छीणार्‍या ग्राहकांवरही कंपनी अधिक लक्ष केंद्रीत करणार आहे.

डेनिस म्हणाले की आम्ही सादर केलेल्या मोटो जी स्मार्टफोनच्या किमतीच्या रेंजमध्ये फोन खरेदीस जगात आजमितीस ५०० दशलक्ष ग्राहक उत्सुक आहेत व आम्ही ही संधी हातची घालविणार नाही. येत्या कांही दिवसांत हा फोन लॅटिन अमेरिका, युरोप, कॅनडा येथे सादर केला जात असून भारतात तो जानेवारीत सादर केला जाईल. त्याचवेळी तो दक्षिण पूर्व आशिया व मध्यपूर्वेतही सादर होईल. चीन सर्वात मोठी बाजारपेठ असली तरी या फोनसाठी गुगल सर्च, जीमेल, व अन्य गुगल वेब असल्याने तो चीनमध्ये विकता येणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. गुगलने मोटोरोलाचे अधिग्रहण केल्यानंतर कंपनीने हे नवे दुसरे प्रॉडक्ट बाजारात आणले आहे. यापूर्वी मोटो एक्स स्मार्टफोन सादर केला गेला आहे.

Leave a Comment