निसर्गाचा चमत्कार- इंद्रधनुषी निलगिरीची झाडे

सर्दी, अंगदुखी सारख्या विकारांवर निलगिरीचे तेल सर्रास वापरले जाते. ज्या झाडांपासून हे औषधी तेल मिळते, त्या झाडांची लागवड मुख्यत्वे या औषधी तेलासाठी तसेच लाकूड मिळविण्यासाठी केली जाते. मात्र हे गुण नसलेले तरीही आकर्षक असे निलगिरीचे झाड -युकॅलिप्टस डेग्लुप्टा मिडगो गम किवा इंद्रधनुषी गम या नावाने प्रसिद्ध आहे.

विशेष म्हणजे या झाडाच्या अनेकपदरी खोडावर दिसणारे विविध रंग हे जसे याचे मुख्य आकर्षण आहे तसेच कागद बनविण्यासाठी या झाडाचे लाकूड मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. वर्षभर या झाडाच्या खोडावर नवीन साल येत राहते. व त्यातूनच अनेक आकर्षक रंग या झाडाच्या खोडावर उमटतात. प्रथम अगदी सुरवातीला चमकदार हिरवा रंग सालीला असतो. ती साल जुनी होते तेव्हा त्याचा रंग अनुक्रमे निळा, जांभळा, केशरी व मरून होत जातो. साल येण्याची प्रक्रिया सततच होत असल्याने एकाचवेळी असे अनेक रंग या झाडावर पाहायला मिळतात.

हा सदाहरित वृक्ष वर्षाला ८ फूट वाढतो व त्याची उंची ६० ते ७५ मीटरपर्यंत जाते. पेपर बनविण्यासाठी म्हणून या झाडांची लागवड अलिकडे मुद्दाम केली जात आहे तसेच सजावटीचे झाड म्हणूनही हे ओळखले जाते. फिलिपिन्समध्ये याची लागवड १९१८ पासूनच केली जात आहे. दमट जागी ही झाडे चांगली वाढतात. मात्र नैसर्गिक रित्या ही झाडे उत्तर गोलार्धात तसेच इंडोनेशिया व दक्षिण पूर्व आशियात आढळतात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment