पुणे – दररोज टीव्ही चॅनेलवर शेकडो चित्रपट दिसत असले तरी मल्टिप्लेक्स्चे गारूड प्रेक्षकांना आकृष्ट करतच असते. पुण्यात जगातील चौथ्या क्रमांकाचे व भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय चित्रपट प्रदर्शक असलेल्या सिनेपोलिसच्या वतीने भारतातील सर्वात मोठे चित्रपटगृह पुण्यात सुरू करण्यात आले आहे. १६ नोव्हेंबरपासून हे चित्रपटगृह प्रेक्षकांच्या सेवेत रुजू होणार असल्याची माहिती मगरपट्टा सिटीचे व्यवस्थापकीय संचालक सतीश मगर यांनी बुधकारी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी सिनेपोलिस इंडियाचे कंट्री हेड आशिष शुक्ला, देवांग संपत, सिझन मॉलचे शिरिष मगर उपस्थित होते. या १५ स्क्रीन मेगाप्लेक्समध्ये डिजीटल तंत्रज्ञान, रिअलडी, थ्रीडी तंत्रज्ञान, हॉलीवुड स्टॅन्डर्ड ४ के डिजीटल स्क्रीन्स व ७.१ डॉल्बी डिजीटल ऑडिओ या सुविधांचा समावेश आहे. तसेच या ठिकाणी भारतातील पहिल्याच ३ व्हीआयपी स्क्रीन्सचाही समावेश आहे. व्हीआयपी स्क्रीन्सवर चित्रपट पाहण्याचा आलीशान अनुभव देणारी ही जगातील पहिलीच कंपनी आहे, असे मगर यांनी सांगितले.
शुक्ला म्हणाले, आम्ही भारतामध्ये सिनेपोलिस व्हीआयपीसह मेगाप्लेक्स संस्कृती रुजविण्यासाठी अत्यंत उत्सुक आहेत. भारतामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचा चित्रपट अनुभव देण्याबरोबरच जगातील अन्य नवे प्रवाहही सादर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रेक्षकांना या ठिकाणी दररोज चित्रपटांच्या ८० हून अधिक शोजचा आनंद घेता येईल. हे शो देशातील अन्य कुठल्याही चित्रपटगृहांहून संख्येने अधिक आहेत. तसेच मेगाप्लेक्स ङ्गॉरमॅट हा नेहमीच्या हिंदी व इंग्रजी चित्रपटांबरोबरच मराठी आणि अन्य स्थानिक भाषांतील चित्रपटांनाही प्राईम टाईम स्लॉट मिळवून देणारे उत्तम व्यासपीठ ठरणार आहे. तेलुगू, तामिळ व गुजराती चित्रपटांना स्क्रीन्सच्या मर्यादित संख्येमुळे मोठे स्क्रीन्स मिळत नाहीत. त्यांच्यासाठीही बाजारपेठ विकसित करण्याचे प्रयत्न करणार असल्याचे शुक्ला यांनी सांगितले.