सचिनच्या मॅचच्या पासेसचा काळा बाजार, तिघांना अटक

मुंबई – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या अखेरच्या कसोटी मॅचच्या तिकिटासाठी चाहत्यांना वानखेडे स्टेडियमवर तासंतास रांगा लावल्यात, दिवसभर ताटकळत तिकिटांसाठी प्रतिक्षा केली मात्र पदरी निराशाच आली. मात्र त्याच मॅचच्या तिकिटांमध्ये काळाबाजार झाल्याची बाब आता समोर आली आहे.

या मॅचसाठी सामान्य क्रिकेटप्रेमींच्या वाट्याला केवळ साडे चार हजार तिकीटं आलीयत. तर क्लब्ज आणि जिमखान्यांना 17 हजार तिकिटांचं वाटप करण्यात आलंय. याच तिकिटांचा काळाबाजार होत असल्याचं समोर आलंय. तिकिटांचा काळाबाजार करणार्या तिघा जणांना मुंबई क्राईम ब्राँचच्या अधिकार्यांनी अटक केली. जनक गांधी, अजय जाधव आणि गिरीष प्रेमन्ना अशी त्यांची नावं आहेत. जनक गांधी हा गरवारे क्लबचा सदस्य आहे.

अजय हा इस्लाम जिमखान्याचा, तर गिरीष प्रेमन्ना हा बॉम्बे जिमखान्याचा कर्मचारी आहे. क्लबला मिळणारे मोफतचे पासेस हे तिघेजण 25 हजार रुपयांना विकत होते. तर एक हजार रुपयांची तिकिटं 8 ते 15 हजार रुपयांना विकली जात होती. एमसीएनं एकूण 33 हजार तिकिटांपैकी फक्त साडे चार हजार तिकीटं सामान्य प्रेक्षकांना उपलब्ध करून दिली होती. आणि हजारो तिकिटं क्लबना वाटली होती.

Leave a Comment