११/१२/१३ तारखेसाठी लगीनघाई

पुणे – विवाह हा प्रत्येकाच्या आयुष्यात नक्कीच महत्त्वाचा प्रसंग असतो. या दिवसाच्या कडूगोड आठवणी विवाहाला अर्थशतक झाले तरी पुसल्या जात नाहीत. मात्र मुर्हूत पाहून विवाह करणार्‍यांना विवाहाची तारीख संस्मरणीय करणे शक्य नसते. आजकालची युवा पिढी मात्र आयुष्यातील प्रत्येक घटना विशिष्ट रितीने संस्मरणीय करण्याचा प्रयत्न करते मग त्याला विवाह तरी अपवाद कसा असणार? याचे उत्तम उदाहरण म्हणजे पुढील महिन्यात येत असलेली युनिक तारीख. ११/१२/१३ म्हणजे ११ डिसेंबर १३.

यंदा या तारखेला विवाह व्हावा अशी इच्छा असणार्‍या अनेकांनी लग्ननोंदणीसाठी एकच गर्दी केल्याचे चित्र येथील विवाह नोंदणी कार्यालयात काल पाहायला मिळाले. नोंदणी पद्धतीने विवाह करणार्‍यांना १ महिना अगोदर लग्नाची नोटिस द्यावी लागते. त्यानुसार कालच्या दिवसात कार्यालयातकडे सुमारे ५० जणांनी विवाह नोंदणीसाठी अर्ज केले आहेत. फक्त पुण्यातील ही संख्या असून देशभरच नव्हे तर जगभरातही अनेक जोडपी या तारखेला विवाहबंधनात अडकणार आहेत.

पुणे विवाह नोंदणी कार्यालयाचे अधिकारी सुहास गायकवाड यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे कार्यालयाकडे दररोज सरासरी २० अर्ज येतात. मात्र ११/१२/१३ या तारखेसाठी ५० अर्ज आले. गर्दी इतकी झाली की कार्यालयाची वेळ वाढवावी लागली. यापूर्वी ११/११/११ या तारखेला ४० विवाह नोंदले गेले होते तर १२/१२/१२ ला ७० विवाह नोंदणी झाली होती. यंदा हा आकडा ५० आहे व अनेकांना निराश होऊन परत जावे लागले आहे. विशेष म्हणजे विवाह नोंदणीसाठी या विशिष्ट दिवशी अर्ज करणार्‍यांत सर्व जाती धर्माचे लोक आहेत.

ज्योतिषशास्त्राप्रमाणे ११/१२/१३ ला लग्नमुहूर्त नाही. मात्र आजकालच्या पिढीचा मुहूर्त पाहून लग्न करण्याकडे कमीच कल आहे. त्या ऐवजी अशा विशिष्ट दिवशी लग्न करण्यास ते पसंती देतात व विशेष म्हणजे कुटुंबियांचाही त्यांना पाठिबा असतो असे दिसून येत आहे.

Leave a Comment