नवी दिल्ली – नॅनोच्या विस्तार प्रकल्पासाठी पश्चिम बंगालमध्ये परतणार आहोत व त्यासाठीच सिंगूरची जागा ठेवली असल्याचे टाटा मोटर्सतर्फे सुप्रीम कोर्टात सांगण्यात आले आहे. टाटा मोटर्सने गुजराथेतील आणंद येथे नॅनोचा कारखाना सुरू केला आहे मात्र या कारखान्यासाठी प.बंगालमध्ये घेतलेली सिंगूर येथील जमीन परत केलेली नाही त्यासंदर्भात न्यायालयाने विचारलेल्या प्रश्नाला हे उत्तर दिले गेले आहे.
कंपनीचे कौन्सिल हरीष साळवे या संदर्भात म्हणाले की आज कारखान्यासाठी कुठेही जमीन मिळणे ही अशक्य बाब बनली आहे. नॅनोचा विस्तार फेज वाईज होत आहे. पहिली फेज गुजराथेत सुरू केली गेली आहे मात्र त्याचा विस्तार सिंगूर येथे केला जाणार आहे. आमचे वेंडॉर्स अजूनही तेथेच आहेत. डाव्यांच्या सरकारने ९९७ एकर जमीन टाटांना नॅनो प्रकल्पासाठी ९० वर्षांच्या करारावर दिली होती. मात्र तृणमूल काँग्रेसचे सरकार येताच त्यांनी ४०० एकर जमीन शेतकर्यांना परत करावी असे आदेश काढल्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले आहे. याची अंतिम सुनावणी एप्रिल मध्ये होणार असून त्यासाठी दोन न्यायाधीशांचे बेंच नेमले गेले आहे.