नेहरुंचे योगदान

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांना प्रत्यक्ष पाहिलेले लोक आता ङ्गार कमी संख्येने जिवंत असतील. परंतु स्वातंत्र्य लढ्यापासून भारत-चीन युध्दापर्यंत पंडित नेहरु जनतेमध्ये विलक्षण लोकप्रिय होते. त्यांच्या लोकप्रियतेची कल्पनासुध्दा आता कोणाला येणार नाही. पण त्यांनी आधुनिक भारताचे शिल्पकार हे त्यांना मिळालेले अभिधान शब्दशः खरे करून दाखवले होते. गेल्या आठवड्यात भारताचे एक अवकाश यान मंगळाकडे झेपावले आणि महिनाभरात भारतामध्ये देशातल्या ६६ टक्के लोकांना स्वस्त धान्य देण्याची योजना राबवली जात आहे. कारण धान्याची उपलब्धता चांगली आहे. परंतु या गोष्टी आपल्याला का शक्य झाल्या याचा आपण विचार करत नाही. पंडित जवारहलाल नेहरु यांनी देशाच्या बांधणीसाठी विज्ञानाचा पाया घातला म्हणून आपल्याला हे शक्य झाले आहे. हे कधीही विसरता कामा नये. त्यांची आज जयंती आहे. १९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाला होता आणि ४६ सालपासून पंडित नेहरु भारताचे पहिले हंगामी पंतप्रधान म्हणून काम करत होते. त्यांच्या याच कार्यकालात देशाचे विभाजन झाले, भारताला स्वातंत्र्य मिळाले. परंतु भारताचा राज्य कारभार कशाच्या आधारावर करणार हा प्रश्‍न होता. त्यासाठी तयार करावी लागणारी राज्यघटना ही धर्मातीत असली पाहिजे असा नेहरुंचा आग्रह होता आणि त्यांनी तो सत्यात उतरवून दाखवला.

त्यांच्याच नेतृत्वाखाली असलेल्या हंगामी सरकारने घटना समितीची निवडणूक घेतली आणि घटना तयार केली. काही लोकांना या सगळ्या घटना सोप्या आणि सहज वाटतात परंतु त्या ङ्गार गुंतागुंतीच्या आणि लांब पल्ल्याचा दृष्टिकोन ठेवून कराव्या अशा असतात. भारताची घटना नेमकी कशी असावी यावर अनेक बाजूंनी ओढाताण सुरू होती. परंतु नेहरुंनी ज्या पध्दतीची घटना तयार करण्याचा आग्रह धरला त्या प्रकारामुळे देशाला राजकीय स्थैर्य प्राप्त झाले. भारताची राज्यघटना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केली पण आंबेडकरांवर यासंबंधात प्रामुख्याने ‘मसुदा’ तयार करण्याची जबाबदारी होती. घटनेला संबंधाने स्वीकारावयाचा दृष्टिकोन आणि देशाची उभारणी करण्यासाठी स्वीकारावी लागणारी राजकीय सामाजिक भूमिका याबाबतीत सर्व राजकीय पक्षांच्या आणि अनेक धुरिणांच्या मदतीने विचार केला गेला आहे. त्यात नेहरू आघाडीवर होते. कारण ते देशाचे पंतप्रधान होते. सध्या आपल्या देशामध्ये नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात किंवा त्यांच्यामुळे नेहरु विरुध्द पटेल असा वाद रंगवला जात आहे.

भारताचे पंतप्रधानपद नेहरुंच्या ऐवजी वल्लभभाई पटेल यांच्याकडे आले असते तर देश वेगळा झाला असता असे मोदी आणि त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. आपण घटकाभर हे गृहितही धरू की नेहरुंच्या ऐवजी पटेल पंतप्रधान झाले असते तर देशाचे चित्र वेगळे राहिले असते. ही गोष्ट कोणीही मान्यच करील. कारण प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगळा असतो, त्याची विचार करण्याची पध्दती वेगळी असते. त्यामुळे त्याच्या नेतृत्वाचा बाजही वेगळा असतो. त्यामुळे कोणीही पंतप्रधान झाला असता तरी देशाचे चित्र वेगळेच झाले असते असे म्हणावे लागते. असे असले तरी पंडित नेहरु यांच्या धोरणांमुळे आणि स्वभावामुळे देशाचे जे चित्र निर्माण झाले हे वाईट आहे हे सूचित करण्याचा या लोकांचा हेतू असतो तो तर्कशुध्द नाही. कारण पंडित नेहरुंनी देशाच्या विकासाचा चांगला पाया घातला आहे. नेहरुंच्या काळात देश नव्याने स्वतंत्र झाला होता. त्या काळात भारताचे चित्र काय होते याचा विचार केला म्हणजे आताच्या चित्राची किंमत कळते. त्यावेळी देशात चार टक्के लोक साक्षर होते आणि ९६ टक्के लोक निरक्षर होते. निरक्षरता, अशिक्षितपणा, रुढीप्रियता, जातीय भावना आणि राष्ट्रीय भावनेचा अभाव अशा सार्‍या वातावरणामध्ये पंडित नेहरुंनी चांगला देश उभा करण्याचा प्रयत्न केला.

देशाला विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आधारावर मोठे करण्याला काही पर्याय नाही. हे ओळखून पंडितजींनी देशात १८ ठिकाणी विज्ञानाच्या विविध क्षेत्राला वाहिलेल्या प्रयोगशाळा स्थापन केल्या. अणुऊर्जा आयोग निर्माण केला. अवकाश संशोधन संस्था स्थापन केली. भारताचा मार्स मिशन हा उपग्रह नुकताच अवकाशात सोडला गेला आहे. या संबंधात भारताने मिळवलेले यश पंडित नेहरुंनी स्थापन केलेले आहे. या विविध प्रयोगशाळांंमुळेच मिळू शकले आहे. हे विसरता येत नाही. नेहरुंनी देशाची संरक्षणसिध्दता ङ्गारशी बळकट केली नाही असा अनेक लोकांचा आक्षेप असतो. परंतु त्याकाळची आपली आर्थिक परिस्थिती विचारात घेतली तर संरक्षणसिध्दतेला किती मर्यादा होत्या हे लक्षात येते. देशात त्यावेळी ९६ टक्के लोक दारिद्रय रेषेखालील जीवन जगत होते. देशात त्यावेळी ६ कोटी टन धान्य उत्पादन होत होते आणि देशाची गरज त्यापेक्षा जास्त होती. तेव्हा आधी लोकांच्या पोटाला पुरेल एवढे धान्य उत्पादित करणे हे देशाच्या सरकारचे कर्तव्य होते आणि नेहरुंनी ते पार पाडले. त्यामुळे पुढे १९७० च्या दशकात हरित क्रांती होऊ शकली आणि देश धान्यांच्या बाबतीत स्वावलंबी झाला.

Leave a Comment