इजिप्तच्या कांद्याला टेस्टच नाही

पुणे – देशांतील कांदा टंचाई दूर करण्यासाठी आणि कांद्याचे वाढलले भाव खाली यावेत यासाठी परदेशातून कांदा आयात सुरू झाली असतानाच पुण्याच्या बाजारात प्रथमच आलेल्या इजिप्तच्या काद्यांने मात्र ग्राहकांची तसेच हॉटेल व्यावसायिकांची पूर्ण निराशा केली आहे. परिणामी हा कांदा खरेदी करण्यास कोणीच उत्सुक नसल्याचे चित्र सध्या बाजारात दिसत आहे.

इजिप्तमधून आलेला कांदा प्रथम मुंबईत व तेथून पुण्याच्या मार्केट यार्डात दाखल झाला आहे. हा कांदा आपल्या नेहमीच्या कांद्यापेक्षा आकाराने दुप्पट आहे. सुरवातीला हॉटेल व्यावसायिकांनी हा कांदा खरेदी केला मात्र त्यात पाण्याचे प्रमाण खूपच असल्याने कांद्याची खरी झणझणीत चवच त्याला नाही. शिवाय पाण्याच्या अति प्रमाणाने तो कापणेही अवघड जात आहे. फ्रिज मध्ये ठेवून ग्रेव्हीसाठीही त्याचा वापर करता येत नाही आणि चिरलेल्या कांद्याची चव खोबर्‍यासारखी असल्याने ग्राहकही नाराज होत आहेत असे हॉटेल चालकांचे म्हणणे आहे.

आडते असोसिएशनचे उपाध्यक्ष सूर्यकांत थोरात यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे इजिप्तमधून आलेल्या कांद्यात पाणी जास्त असल्याने त्याला चोवीस तासात कोंब येत आहेत. त्यामुळे तो साठवणे अशक्यच आहे. पुण्रात हा कांदा प्रथमच आला आहे मात्र २०१० सालात इराण आणि इराकमधून कांदा आयात झाली होती त्यासारखाच हा कांदा आहे. वाहतुकी दरम्यानही तो दबतो त्यामुळे ग्राहक खरेदी करण्यास तयार नाहीत.

Leave a Comment