अतिरेक्यांना मदत : मंगलोरमध्ये महिला अटकेत

बंगळूर – इंडियन मुजाहिद्दीनच्या भारतातील अतिरेक्यांना हवाला रॅकेटच्या माध्यमातून आर्थिक मदत करणार्‍या कर्नाटकातील मंगलोर इथल्या आयेशा बानू या महिलेला बिहारच्या पोलिसांनी कर्नाटकातील पोलिसांच्या मदतीने अटक केली. तिला अटक करून बिहार पोलिसांच्या तुकडीने पाटण्याकडे नेले आहे. आयेशा बानू ही मंगलोरमध्ये रहात असली तरी तिने बिहारमधल्या ५० बँकांमध्ये खाती उघडली आहेत आणि ती मंगलोरमध्ये बसून या खात्यांचे व्यवहार ऑनलाईन पाहते.

२७ ऑक्टोबरला पाटण्याच्या गांधी मैदानावर नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या वेळी झालेल्या बॉम्बस्ङ्गोटातला प्रमुख आरोपी इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी तेहसीन अख्तर याला आयेशाने वेळोवेळी आर्थिक मदत केली असल्याचे तपासात आढळले आहे. या संबंधात झारखंडमधील गोपाळ, विकास, पवन आणि गणेश या चौघांना अटक करण्यात आलेली आहे. त्यांना छत्तीसगडमध्ये अटक केली आणि त्यांचा जबाब नोंदला तेव्हा त्यांनी हवाला रॅकेटच्या माध्यमातून दहशतवाद्यांना पैसे देत असल्याचे कबुल केले.

त्यांच्या जबाबातच आयेशा बानू हिचे नाव निष्पन्न झाले. आयेशा बानूच्या माध्यमातून या झारखंडमधील चौघांना पाकिस्तानमध्ये राहणारा इब्राहिम नावाचा माणूस योग्य त्या सूचना देत होता. आयेशा बानूला त्यानेच खाती उघडून दिली आहेत आणि तिने आतापर्यंत या खात्यातून १ कोटी रुपयांचा व्यवहार केला आहे. पोलिसांनी तिला मंगलोरमध्ये अटक केली तेव्हा तिच्याकडे २० एटीएम कार्डे आणि ३५ पासबुक आढळले.