स्पोर्टस बेटींग कायदेशीर करा – सीबीआय संचालक

नवी दिल्ली – क्रीडा क्षेत्रात बेटींग कायदेशीर करावे असे मत सीबीआयचे संचालक रणजितसिंग यांनी मंगळवारी व्यक्त केले.येथे भरलेल्या तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेत एथिक्स, इंटिग्रिटी इन स्पोर्टस या विषयावर ते बोलत होते.

रणजितसिंग म्हणाले की आपल्याकडे क्रीडा क्षेत्रात बेटींग करण्यावर बंदी आहे मात्र प्रत्यक्ष अनुभव असा आहे की या बंदीचा कांहीही उपयोग होत नाही. क्रीडा क्षेत्रातील भ्रष्टाचार रोखण्यास विशेष कायदा केला गेला तर क्रीडा क्षेत्रात बेटींग कायदेशीर करण्यात कोणतीही हानी होणार नाही. राज्याराज्यातून लॉटरी आहे, हॉलिडे रिसॉर्टमध्ये कॅसिनो आहेत व काळा पैसा जाहीर करण्याच्या योजना सरकार जाहीर करते आहे मग बेटींग कायदेशीर करण्यात अडचण येण्याचे कारण काय?

क्रीडा क्षेत्रातील भ्रष्टाचार हा या क्षेत्राचे पावित्र्य घालवितो. मॅच फिक्सिंग, जुगार, बेटींग, स्पॉट फिक्सिंग हे भ्रष्टाचाराचेच अनेक नमुने आहेत असेही रणजितसिग यांनी सांगितले.

भारताच्या क्रिकेट क्षेत्रात वॉल म्हणून ओळखला जाणारा राहुल द्रविड यावेळी बोलताना म्हणाला की भ्रष्टाचार कमी होत असेल तर बेटींग कायदेशीर करण्यात कांही गैर वाटत नाही. कोणतीच क्रीडा समिती असले गैरप्रकार रोखण्यास पुरेशी सक्षम नाही कारण त्यांना पुरेसे अधिकारच नाहीत. अशावेळी अशा प्रकरणातील खेळाडूवर बंदी आणणे अथवा त्याला निलंबित करणे इतकेच शिक्षेचे स्वरूप राहते मात्र प्रत्यक्ष बेटींगमध्ये सक्रीय असलेले मोकळेच राहतात.