सिरम इन्स्टिट्यूट बनविणार डेंग्यू प्रतिबंधक लस

पुणे – येथील सिरम इन्स्टिट्यूटने जगभरात धुमाकूळ घालत असलेल्या आणि अद्याप ज्यावर लस तयार नाही अशा डेंग्यू साठी प्रतिबंधक लस तयार करण्याचे आव्हान स्वीकारले असून यासाठी संस्था थायलंडमधील महिडोल विद्यापीठाचे सहकार्य घेणार आहे असे संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ.राजीव ढेरे यांनी सांगितले.

या विषयी अधिक माहिती देताना डॉ.ढेरे म्हणाले की आक्टोबरपर्यंत भारतात यंदा ५५,०६३ जणांना डेंग्यूची लागण झाली असून आत्तापर्यंत त्यात १३८ जणांचा मृत्यू झाला आहे. जगभरात डेंग्यूचे डास चावल्यामुळे दरवर्षी ५० दशलक्ष लोकांना डेंग्यूची लागण होते पैकी पाच लाख केसेस या डेंग्यू हमरेज फिवर च्या असतात. जगात दरवर्षी किमान २२ हजार लोक या साथीत मरण पावतात. मात्र डेंग्यूवर अद्यापी प्रभावशाली प्रतिबंधक लस तयार झालेली नाही.

जपानी एनसेफालिस व्हायरस तसेच पिवळा ताप यावर प्रतिबंधक लसी आहेत. मात्र डेंग्यूवर अजूनही प्रतिबंधात्मक उपायांवरच भर दिला जात आहे. अर्थात हे प्रतिबंधात्मक उपाय पुरेस ठरत नाहीत असा अनुभव आहे. त्यावर होणारा खर्च पाहता तुलनेने त्यांचा उपयोग फारच मर्यादित आहे. सध्या जागतिक आरोग्य संघटनेच्या सहकार्याने दिल्लीतील इंटरनॅशनल सेंटर फॉर जेनेटिक इंजिनिअरिंग व बायो टेक्नॉलॉजी येथे डेंग्यूवर संशोधन सुरू आहे असे सांगून ढेरे म्हणाले की थायलंडमध्येही लस विकसित केली गेली आहे मात्र त्याच्या क्लिनिकल ट्रायल झालेल्या नाहीत.

सिरमने यापूर्वीही स्वाईन फ्ल्यूवर लस बनविण्यात यश मिळविले आहे. त्याचप्रमाणे डेंग्यूवरही लस बनविण्याचा प्रयत्न संस्थेने सुरू केला आहे आणि लस तयार करून त्याच्या क्लिनिकल चाचण्या घेऊन ती बाजारात आणली जाणार आहे. डॉ. ढेरे म्हणाले की डेग्यूचा भारतात वारंवार उद्रेक होतो आहे आणि त्याचा आरोग्य सेवांवर ताणही बराच येतो आहे त्यामुळे प्रतिबंधक लस हा त्यावरचा खात्रीचा मार्ग आहे.

Leave a Comment